चिऊताईला हवे हक्काचे घर!
By admin | Published: March 20, 2017 04:16 AM2017-03-20T04:16:03+5:302017-03-20T04:16:03+5:30
पूर्वीच्या दाट वनांमध्ये प्राणीपक्ष्यांनी जीवन समृद्ध होते, अशा या अप्रतिम सौंदर्यसंपन्नतेचे वर्णन तत्कालीन कवितांमधून
खोडद : पूर्वीच्या दाट वनांमध्ये प्राणीपक्ष्यांनी जीवन समृद्ध होते, अशा या अप्रतिम सौंदर्यसंपन्नतेचे वर्णन तत्कालीन कवितांमधून, गीतांमधून नेहमीच होत आले आहे. पर्यावरण व निसर्गातील पशुपक्ष्यांविषयी वर्णन करण्यासाठी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले ‘जहाँ डाल डाल पर सोने कि चिडियाँ करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा...! हे देशभक्तीपर गीत आपल्या सर्वांचेच आवडीचे व परिचीत आहे. या गीतामध्ये लेखकाने चिमणीला ‘सोने की चिडियाँ’ असा उल्लेख करून आपल्या लाडक्या व आवडत्या चिऊताईला म्हणजेच चिमणीला सोन्याची उपमा दिली आहे. निश्चितच यावरून आपल्या लक्षात येते,की एकेकाळी आपल्या देशात चिमण्यांची संख्या मुबलक होती. सध्या सिमेंट काँक्रिटच्या जंगलात निसर्गाचा समतोल ढासळला आणि पक्षी माणसापासून दूर जाऊ लागले.
‘भारतीय चिमणी म्हणजे इंग्रजीमधील इंडियन हाऊस स्पॅरो, ही चिमणी १५ सेंमी लांबीची व सुमारे २० ते २२ ग्रॅम वजनाची असते. विणीच्या हंगामात जोडीने राहणाऱ्या या चिमण्या हंगाम नसताना मोठ्या थव्याने रात्रीच्या वेळी एकत्र मुक्काम करतात. त्यांची स्वत:ची अशी वसतिस्थाने असतात. त्या नेहमीच जमावाने किंवा घोळक्याने दिसतात. चिमणा-चिमणीची जोडी हंगामाच्या दिवसात सतत प्रणयमग्न झालेली दिसून येते. या काळात त्यांच्या प्रेमाला भरती येते. चिर्रर... चिर्रर... चिर्रर अशा काहीशा मोठ्या आवाजात नर गाऊ लागतो, मग मादी त्याच्याजवळ येऊन पिसे काढण्याचे नाटक करते, यातच एकमेकांचा जोडीदार ठरला जातो. खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी सांगितले. ‘संपूर्ण जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात शेतीसाठी सर्वाधिक खतांचा वापर केला जातो, याचाच दुष्परिणाम चिमण्यांवर झाला आहे. चिमण्यांच्या पिलांचे मुख्य अन्न म्हणजे पिकांवरील कीटक व सुरवंट होय. पिलांच्या जन्मानंतर सुरुवातीचे १५ दिवस पिलांना या कीटकांवरच उदरनिर्वाह करावा लागतो. चिमण्यांची पिले जन्मत: दाणे खाऊ शकत नाहीत, पण शेती पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीमुळे पिलांचे अन्नच नाहीसे झाले आहे, पिलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे कीटकच न मिळाल्याने चिमण्यांची पिले अल्पायुषी होत आहेत. साधारणपणे ९०च्या दशकात भारतात मोबाईल क्रांती झाली. शहरातील इमारतींवर तर ग्रामीण भागातील शेतांमध्ये मोबाईलचे टॉवर्स उभे राहीले. मात्र या मोबाईल टॉवर्समधून प्रवर्तीत होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी चिमण्यांसह माणसालाही हानीकारक ठरत आहे. विद्युत चुंबकीय लहरींमुळे स्पेनमधील चिमण्या गायब झाल्या, हे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. चिमण्यांच्या प्रजननशक्तीवर व आरोग्यावर या लहरींचा मोठा परिणाम होत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे.