भिडेवाड्यात पुन्हा मुलींची शाळा निर्माण करणार - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:14 AM2021-11-29T09:14:42+5:302021-11-29T09:15:02+5:30
Chhagan Bhujbal : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
पुणे : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित १३१ वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिनाचे औचित्य साधून रविवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना समता पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी छगन भुजबळ होते. व्यासपीठावर मध्य प्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार पंकज भुजबळ, दीप्ती चौधरी, कमल ढोले पाटील, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, प्रा. हरी नरके, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, भिडेवाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल. फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक भूमी संपादन प्रक्रिया पूर्ण करून कामास तात्काळ प्रारंभ करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येईल. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी त्याचे अनावरण केले जाईल. संविधान धोक्यात आले आहे. संविधान नष्ट झाले तर तुमचे अस्तित्व धोक्यात येईल. महात्मा फुले यांच्या वेळी जे धोके होते, ते आजही आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी केलेले समाज सुधारण्याचे कार्य महत्त्वपूर्ण आहे, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी सांगितले.