बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 08:23 AM2024-07-15T08:23:10+5:302024-07-15T08:25:01+5:30
महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत भुजबळ यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान रॅली पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण प्रश्नावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत भुजबळ यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र भुजबळ यांचं भाषण सुरू असतानाच सभेतील कार्यकर्त्यांकडून 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा सुरू झाल्या आणि काही काळ गोंधळाचं वातावरण झालं.
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. या निर्णयामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत भुजबळ यांनी बारामतीतील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. परंतु भुजबळ यांच्या भाषणावेळी सभास्थळी घोषणाबाजीला सुरुवात झाली. हे पाहून भुजबळांच्या शेजारीच उभ्या असणाऱ्या अजित पवारांनी तरुणांकडे इशारा करत त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही घोषणाबाजी सुरूच होती.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
"आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गाजत आहे. काही लोकांचा विचार आहे की आपापसात दंगे व्हावे, असा प्रयत्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत; पण आमचं म्हणणं आहे की, ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये," अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. बारामती येथे राष्ट्रवादीच्या वतीनं बारामतीमध्ये राज्यव्यापी जनसन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी आरक्षण प्रश्नावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला.
"आरक्षणाचे भांडण मिटावं म्हणून सरकारने नुकतीच सह्याद्रीला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी येऊन मार्गदर्शन करावे, सगळं प्रकरण कसं शांत होईल. सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी येणे क्रमप्राप्त होते. मी विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा बोललो होतो. त्यांना सांगितलं की शरद पवार यांनासुद्धा बोलवा. कारण व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षा ही होती की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी तिथे यायला हवं होतं. मात्र असं सांगितलं जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते, पण सायंकाळी ५ वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला," असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.