जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 07:53 PM2023-07-10T19:53:29+5:302023-07-10T19:56:41+5:30

नाशिकवरून पुणेकडे जाताना छगन भुजबळ यांनी आमदार बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली....

Chhagan Bhujbal met junnar MLA Atul Benke; Political arguments were given rise to | जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

googlenewsNext

नारायणगाव (पुणे) :जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहून २०२४ ची निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करून २४ तास उलटत नाहीत तोच राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार अतुल बेनके यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले असून बेनके आपला निर्णय बदलणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार अतुल बेनके यांनी जाहीर केलेला निर्णय बदलावा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ द्यावी असा सल्ला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नाशिकवरून पुणेकडे जाताना छगन भुजबळ यांनी आमदार बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली. यावेळी माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांनी आमदार बेनके यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

याबाबत आमदार अतुल बेनके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या निवासस्थानी भेट दिल्याचे स्पष्ट करून सद्यस्थितीत तटस्थ राहून २०२४ ची निवडणूक न लढविण्याची भूमिका बदलावी असा सल्ला भुजबळ यांनी दिला असल्याचे सांगितले. शरद पवार, अजित पवार आणि तुमच्यावर आमची आस्था आहे, कोणासोबत जावे आणि कोणाच्या विरोधात जावे असा प्रश्न आपल्यासमोर आहे. आपण पवार साहेब आणि दादांशी बोललो आहे, असे स्पष्टीकरण आमदार बेनके यांनी दिले आहे.

आमदार बेनके यांच्या निवासस्थानी बोलताना भुजबळ म्हणाले की, माझे वडील जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील आहेत. पूर्वी मीही या मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा विचार केला होता. मात्र, येवला मतदार संघ निवडला आणि तिथून मी चार – पाच वेळा निवडूनही आलो आहे. काही आमदार संभ्रमावस्थेत आहेत की कोणाकडे जावे, तेही आमदार अजित पवार यांच्यासोबत येतील. तुमचे वय झाल्याने तुम्ही थांबणार का ? यावर बोलताना भुजबळ मिश्कीलपणे म्हणाले की, माझ्या पुतण्याने सांगितल्यावर मीही थांबेन.

पुण्याच्या दिशेने चाललेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे नारायणगाव येथे भाजपा आणि समता परिषदेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे, समता परिषदेचे पदाधिकारी यांनी भुजबळ यांचे स्वागत केले. यावेळी आशिष माळवदकर, राजेंद्र कोल्हे, प्रा. पंजाब कथे, अशोक दरेकर , रमेश वायकर, राजेंद्र मेहेर, अमोल भुजबळ, दिलीप गांजले, शरद दरेकर, किशोर पोखरणा, अशोक पाटे ,रामभाऊ तोडकरी, बाळासाहेब भुजबळ, आत्माराम संते, मनीषा पारेकर , प्रणव पाटे, अमित औटी, अक्षय डोके, महेंद्र कोल्हे, गणेश शिंदे, अक्षय खैरे, सोपान खैरे मनोज वामन आदी उपस्थित होते.

Web Title: Chhagan Bhujbal met junnar MLA Atul Benke; Political arguments were given rise to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.