छगन भुजबळ यांचे ‘अथर्वशीर्ष’ वरून पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:37 PM2022-11-28T16:37:39+5:302022-11-28T16:37:54+5:30
प्रभारी कुलगुरूंना अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्याचा अधिकारच नाही
पुणे : ’अथर्वशीर्ष' अभ्यासक्रम घेण्यासाठी निर्णय घेण्याकरिता कोणतीही अभ्यास समिती अस्तित्त्वात नाही. सध्या जे कुलगुरू आहेत ते प्रभारी आहेत. त्यांना तो अधिकार नाही, कोणाची परवानगी नाही. असे असताना खुशाल तुम्ही त्याला श्रेयांक देणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या ‘अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमावर टीका केली. आपण कुठे घेऊन चाललो आहे हे सगळे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे'तर्फे आयोजित कार्यक्रमासाठी भुजबळ पुण्यात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. सगळ्या धर्मात अशा कितीतरी गोष्टी असतील त्याही अशाच शिकवाव्या लागतील. विज्ञान, इंजिनिअरिंग, फार्मसी आयटी वगैरे आता शिकायचे नाही का? यातून मन:शांती मिळणार आहे का? त्यासाठी प्राणायाम व योगा करावे लागेल. प्रत्येकाने ते आपापल्या घरात करावे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
नाशिक येथील ’लव्ह-जिहाद' विषयावरील काढलेल्या मोर्चाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्या सगळ्यांना फाटा देण्यासाठी, त्यावर पांघरूण टाकण्यासाठी ‘लव्ह जिहाद' सारखे मुददे उपस्थित केले जात आहेत. अपमानास्पद वाक्ये बोलली जात आहेत. तसेच यातून धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहे. त्यात जनतेला गुंतवून ठेवले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचे जे शीर्षस्थ नेते आहेत त्यांच्या कित्येक मुला- मुलींनी मुस्लिम धर्मियांबरोबर लग्न केले. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण येथे मुद्दाम धार्मिक भावना चेतवण्यासाठी जे वेगवेगळे प्रकार अवलंबले जात आहेत. हिंदू मुस्लिम लढाई सुरू झाली पाहिजे जेणेकरून त्यांना निवडणुकीला फायदा होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
...अन्यथा आंदोलन करणार
मंत्रालयात फुले दांपत्याच्या तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर भिडे वाड्याच्या प्रश्नाबाबतही लवकर बैठक घ्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यावर एक महिन्यात ते काय निर्णय घेतील ते पाहू, अन्यथा आंदोलन तर आम्ही करणारच, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
...म्हणूनच राज्यपालांना इथं ठेवले आहे
मला परत जायचे आहे असे राज्यपाल अनेक दिवसांपासून म्हणत आहेत परंतु दिल्लीच्या लोकांनी त्यांना इथे ठेवले आहे. त्यांना हवे ते काम राज्यपाल चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणून त्यांना कदाचित ठेवले आहे, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.