‘छत्रपती’च्या अध्यक्षांचा अचानक राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:08 AM2018-10-04T00:08:55+5:302018-10-04T00:09:40+5:30
प्रकृतीच्या कारणास्तव पायाची दुखापत वाढल्याने घोलप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तीन दिवसांपूर्वी छत्रपती कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घोलप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.
भवानीनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा अमरसिंह घोलप यांनी अचानक राजीनामा दिला. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देण्याची कारखान्याच्या राजकीय इतिहासातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केल्याचे वृत्त आहे. घोलप यांच्या राजीनाम्यामुळे इंदापूरच्या पश्चिम भागातील राजकीय गणिते बदलणार आहेत.
प्रकृतीच्या कारणास्तव पायाची दुखापत वाढल्याने घोलप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तीन दिवसांपूर्वी छत्रपती कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घोलप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. या सभेत त्यांनी सभासदांच प्रश्नांना समर्पक उत्तरे देत सभा खेळीमेळीत पार पाडली होती. यावेळी राजीनामा देणार असल्याचे देखील घोलप यांनी भासू दिले नाही. ही सभा होऊन दोन दिवसानंतर त्यांनी पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेवून आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्त केला.
२०११ साली विद्यमान अध्यक्ष घोलप यांचे ज्येष्ठ बंधू अविनाश घोलप यांना राजकीय शह देण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळातील दत्तात्रय सपकळ याचा संचालकांचा राजीनामा घेतल्याची चर्चा रंगली होती. तसेच त्यांच्या जागी अमरसिंह घोलप यांना संचालक पदावर घेऊन अध्यक्षपद बहाल केले होते. त्यानंतर अडीच वर्षांनंतर २०१५ साली कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा एकतर्फी विजय झाला. त्यामध्ये अविनाश घोलप, अमरसिंह घोलप यांचा चांगल्या मताधिक्क्याने विजय झाला. त्यानंतर देखील अध्यक्षपदाची माळ अमरसिंह यांच्या गळ्यातच अनपेक्षितपणे पडली. त्यांच्याच काळात कारखान्यात कोट्यवधी रुपयांचा वीजनिर्मिती प्रकल्पासह विस्तारवाढ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.
अध्यक्षपदाची निवड जलद गतीने...
४ सध्या कारखान्याचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जलद निर्णय प्रक्रियेसाठी अध्यक्षपदाची निवड लवकरात करणे गरजेचे आहे. या शिवाय कारखान्यावर कोट्यवधींच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव असणाऱ्या नेतृत्वाची अध्यक्षपदावर निवड करताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे.