पगार देणे शक्य नसतानाही ‘छत्रपती’ची १८० कामगारांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:34+5:302021-08-27T04:16:34+5:30
बेलवाडी येथील शेतकरी तानाजी हरिभाऊ यादव यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट सध्या सभासदांच्या चर्चेचा विषय ...
बेलवाडी येथील शेतकरी तानाजी हरिभाऊ यादव यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट सध्या सभासदांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. यादव यांनी कारखान्याच्या कारभारावर आक्षेप घेत काही बाबी उघड केल्या आहेत. राज्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना हा पहिला कारखाना आहे, जेथे सेवा निवृत्तीनंतर निधन झालेल्या कार्यकारी संचालकाच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नियम डावलून नोकरी दिली जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. ‘सहकार’ शेतकरीवर्गाला सुखाने जगू देणार नाही याची हमी देणारा ‘छत्रपती’ राज्यातील एकमेव कारखाना असल्याचा टोला लगावत त्यांनी सर्व संचालक मंडळाला दंडवत घातले आहे.
नेत्यांनी सभासदाना जो शब्द दिला होता. त्या प्रमाणे ते वागले असल्याचे यादव यांनी या पोस्टमध्ये उपरोधिकपणे नमूद केले आहे. मागील वर्षी आपल्या परिसरातील इतर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना २८०० ते ३००० पर्यंत सरासरी दर दिला आहे. मात्र, आपल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखानाच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदाला २२५० रुपये इतका भरघोस दर मिळाला. कारखान्यात केलेल्या या कारभारामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यामान संचालक मंडळाला विशेष आधिकार वापरुन आणखी ५ वर्षे मुदत वाढ द्यावी, मोदी सरकारने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदासाठी आणखी एक कायदा करावा, असा उपरोधिक टोलादेखील यादव यांनी संचालक मंडळाला लगावला आहे.