छत्रपती संभाजीराजेंनी घेतले सपत्नीक जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन; उचलली 'खंडा' तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 06:33 PM2021-01-28T18:33:42+5:302021-01-28T18:35:50+5:30
लग्नानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे प्रथमच जेजुरी गडावर आले होते.
जेजुरी: खासदार छत्रपती संभाजीराजे व पत्नी संयोगीताराजे यांच्या लग्नाचा गुरुवारी ( दि. २८ ) वाढदिवस आहे. याच निमित्ताने राजे आणि त्यांच्या पत्नी सह देवदर्शनासाठी जेजुरी गडावर आले होते. लग्नानंतर आजतागायत त्यांनी जेजुरी वारी झालेली नव्हती. मात्र गुरुवारी कुलदैवताचे दर्शन घेत त्यांनी विधिवत कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी पूर्ण केले.
महाराष्ट्रातील बहुजन बांधवांचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे खासदार युवराज छ. संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे यांनी आज देवदर्शन घेत कुलधर्म कुलाचार केला. संभाजीराजे यांचे दुपारच्या सुमारास सपत्नीक जेजुरी गडावर आगमन झाले. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नानंतर ते प्रथमच जेजुरी गडावर आले होते. श्रींची माध्यान्ह पूजा - अभिषेक त्यांच्या हस्ते करण्यात आला. कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम ही त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी जेजुरी गडावरील ४२ वजनाची खंडा तलवार देखील उचलली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत ,विक्रम शिंदे ,सागर जगताप ,संतोष हगवणे,आनंद जंगम ,संतोष बयास ,आदि मान्यवर उपस्थित होते .कुलधर्म -कुलाचार व तळीभंडार केल्यानंतर खा. संभाजीराजे यांनी देवसंस्थान विश्वस्त शिवराज झगडे ,संदीप जगताप ,पंकज निकुडे पाटील ,मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. देव संस्थान कडून त्यांनी गडावरील विविध विकासकामे ,येथील ऐतिहासिक घटना व सध्या गडाच्या पायरी मार्गावर साकारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची माहिती घेत समाधान व्यक्त केले.