सावित्रीबाई फुले विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन खुर्चीपुरतेच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 08:15 AM2019-02-19T08:15:21+5:302019-02-19T08:15:53+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : लष्करी अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक स्तरावर संशोधन
दीपक जाधव
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केवळ नावापुरतेच आहे. विद्यापीठातील इतर महापुरूषांच्या अध्यासनांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनामध्ये शिवकालीन इतिहास, शिवाजी महाराजांचे योगदान याबाबत कोणतेही संशोधन कार्य अथवा उपक्रम राबविले जात नसल्याची माहिती उजेडात आली आहे.
पुणे विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महात्मा फुले अध्यासन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, संत नामदेव अध्यासन अशी महापुरूष, संत, विचारवंत, अभ्यासक यांच्या नावाने एकूण १७ अध्यासने आहेत. या अध्यासनामार्फत त्या त्या महापुरूषांचे कार्य, त्यांनी मांडलेले विचार, त्या विचारांचे समकालीन महत्त्व याबाबत संशोधन केले जाते.
अध्यासनाकडून या अनुषंगाने चर्चासत्र, परिषदांचे आयोजन केले जाते. मात्र, १९९६ मध्ये सुरू झालेले छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन अपवाद ठरले आहे.
पॉलिसी चेअर म्हणून अध्यासनाची निर्मिती;
करारानुसार केवळ महाराजांचे नाव
संरक्षणशास्त्र विभाग व लष्कराच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात सुरू केलेल्या अध्यासनाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या अध्यासनात लष्करी अधिकाºयांकडून वैयक्तिक स्तरावर संशोधन केले जाते. पॉलिसी चेअर म्हणून याची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत झालेल्या करारानुसार अध्यासनाला केवळ शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांविषयी कुठलेही संशोधन अथवा उपक्रम याबाबत राबवले जात नाहीत.
- डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षणशास्त्र