"छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य अन् राष्ट्रीय विचार दिला" - बाबासाहेब पुरंदरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:14 PM2021-08-04T17:14:55+5:302021-08-04T17:15:15+5:30

पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शतकोत्सवाबद्दल सत्कार

"Chhatrapati Shivaji Maharaj gave character and national thought to the society" | "छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य अन् राष्ट्रीय विचार दिला" - बाबासाहेब पुरंदरे

"छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य अन् राष्ट्रीय विचार दिला" - बाबासाहेब पुरंदरे

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या सामाजिक - राजकीय जीवनातही आदर्शवत

पुणे : “छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय दिले हे सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही. एका वाक्यात सांगायचे तर महाराजांनी चारित्र्य आणि राष्ट्रीय विचार दिला,” असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. शिवशाहीर पुरंदरे यांनी वयाचे शतक गाठल्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे बुधवारी त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी पुरंदरे बोलत होते.

पुरंदरे म्हणाले, “शिवरायांचे चरित्र म्हणजे केवळ युद्ध नव्हे. प्रत्येकाने सीमेवर जाऊन रक्त सांडले पाहिजे असे नाही. राष्ट्रभावना जागृत ठेवत आपण ज्या क्षेत्रात जे काम करत असू ते अगदी चोखपणे, प्रामाणिकपणे करणे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रामाणिक कामातूनच राष्ट्र घडत असते. व्यक्तीगत आयुष्यात कसे असले पाहिजे हे शिकवणारे चारित्र्य शिवरायांकडे पाहून शिकता येते.” 

शिवरायांच्या राजकीय आकलनाचे उदाहरण देताना शिवशाहीर पुरंदरे म्हणाले, “सुरतच्या अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात,  की हे टोपीकर (इंग्रज) सामान्य साहूकार नव्हेत. यास भूमिची माया फार. यास उखडावे.” “महाराजांनी त्यांची जाणती माणसे परदेशी का पाठवली नाहीत,” याचे तेवढे कुतूहल वाटते.

शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या सामाजिक-राजकीय जीवनातही आदर्शवत, अनुकरणीय आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे शिवशाहीर म्हणाले. शिवाजी महाराजांबद्दलची अपार श्रद्धा आणि आस्था यातूनच लहानपणापासून शिवचरित्राकडे वळलो. आजही पहाटे साडेतीनला उठून केवळ वाचन, वाचन आणि वाचनच करतो, असे त्यांनी सांगितले. शिवचरित्राच्या माध्यमातून आयुष्यात खूप पैसे मिळाले. ते या हाताचे त्या हाताला न कळू देता समाजासाठी खर्चही केले. पण त्याहून आयुष्याची कमाई काय तर जिवाभावाची मिळालेली माणसं होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

श्री महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजीत तांबडे आदी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: "Chhatrapati Shivaji Maharaj gave character and national thought to the society"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.