छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे नायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:57+5:302021-08-17T04:16:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदू धर्माची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे नायक आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गड पायी सर केला होता. वयाच्या ७९ वर्षांत शिवनेरी आणि आता सिंहगड दौरा करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. या वेळी आमदार भीमराव तापकीर, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्त्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान व स्वाभिमान आहेत. त्यांच्यासारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
राज्यपाल यांनी सुरुवातीला लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामास भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. डाॅ. नंदकिशोर मते यांनी राज्यपालांना किल्ले सिंहगड व परिसराची माहिती दिली.
--------------
राज्यपालांसाठी गडावर रांगोळ्यांच्या पायघड्या व औक्षण
शनिवार, रविवार असो अथवा अन्य सुट्टीच्या दिवशी आणि त्यातही पावसाळ्यात सिंहगडावर पुणेकरांसह इतरही नागरिक, पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. पण सोमवारी (दि. १६) गडावर खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येणार म्हणून गडावर राहणाऱ्या नागरिकांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. जागोजागी महिला राज्यपालांचे औक्षण करण्यात येत होते. गडावरील लोकांशी बोलताना आमच्या उत्तराखंडमध्येही असेच गड आहेत. तुम्ही एकदा या तिकडे, असेदेखील ते म्हणाले.
फोटो - कोश्यारी सिंहगड