छत्रपती शिवरायांच्या पालखीचे २८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान! कोरोनामुळे पादुकांचा होणार डोक्यावरून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:38 PM2021-05-20T15:38:46+5:302021-05-20T15:39:02+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पाच शिवभक्तांच्या उपस्थितीत होणार सोहळा
पौड: रायगडाहून पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान २८ जूनला सकाळी ठीक ९ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरी पासून होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पाच शिवभक्तांच्या उपस्थितीत पादुकांचा प्रवास डोक्यावरून होणार आहे.
गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रकोपामुळे रायगडावरुन केवळ तीनच शिवभक्त शिवरायांच्या पादुकांना घेऊन पंढरपूरला गेले होते. कोरोनामुळे निर्माण झालेला उद्रेक पाहून पालखी मार्गातील समाजस्वास्थ्याची अत्यावश्यक काळजी घेऊन गर्दी न जमवता हा सोहळा पार पडला होता.
यंदा रायगडावरून जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेऊन प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाड मधील जिजाऊ मांसाहेबांच्या समाधी छत्री जवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्द मधील मारुती मंदिरात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा मुक्काम श्रीरामपूर येथे असेल. त्यानंतर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गाव मार्गे ४ जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील.
आषाढी एकादशीला चंद्रभागास्नान व नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आषाढी वारीतील शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा श्रीविठ्ठल मंदिरात पार पडेल. गुरुपौर्णिमेस नियोजित राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पादुकांचा परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होऊन केवळ तीनच मुक्कामात पालखी २३ जुलैला पुन्हा रायगडला दाखल होईल.