मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधातेला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:40+5:302021-06-16T04:12:40+5:30
पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेण्याचा आरोप असलेल्या पुणे महानगर पालिकेतील मुख्य विधी सल्लागार मंजुषा ...
पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेण्याचा आरोप असलेल्या पुणे महानगर पालिकेतील मुख्य विधी सल्लागार मंजुषा इधातेचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एरंडवणे शाखेत खाते आहे. त्यात असलेल्या लॉकरच्या चाव्या त्यांच्याकडून जप्त करायच्या आहेत. तसेच तक्रारदाराच्या प्रकरणाची कागदपत्रे जमा करायची आहेत. त्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील अँड. रमेश घोरपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत इधातेला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
अँड. इधातेला कार्यालयात पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. १४) रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. इधातेला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणासह या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी, निरनिराळ्या व्यक्तींचे जबाब घ्यायचे आहेत. त्यासाठी पाच दिवस पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील अँड. रमेश घोरपडे यांनी केली.