पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इथाटे ५० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:05 PM2021-06-14T18:05:23+5:302021-06-14T20:28:36+5:30
पुणे महापालिकेच्या त्या मुख्य विधी अधिकारी म्हणून काम पाहतात.
पुणे : महापालिकेकडून देण्यात येणारा टीडीआर हा नेहमीच वादाचा विषय आजवर ठरत आला आहे. त्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टीडीआर प्रकरणात थेट महापालिकेत सापळा रचून विधी सल्लागार मंजुषा इधाटे यांनाच ५० हजार रुपयांची लाच घेतला सोमवारी दुपारी ४ वाजता रंगेहाथ पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार मिळाल्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अवघ्या ४ तासात सापळा कारवाई संपूर्णपणे यशस्वी करण्यात आली.
विधी सल्लागार मंजुषा सतिश इधाटे (वय ५७) असे अटक केलेल्या महिला अधिकार्यांचे नाव आहे. या कारवाई पाठोपाठ मंजुषा इधाटे यांच्या कोथरुडमधील घराची झडती सुरु करण्यात आली आहे.
टीडीआर प्रकरणाची फाईल अभिप्राय देऊन पुढे पाठविणसाठी तक्रारदार यांनी विधी सल्लागार मंजुषा इधाटे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सोमवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची तातडीने पडताळणी केली. त्यात त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पाठोपाठ महापालिकेच्या जुन्या इमारतीतील इधाटे यांच्या कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना इधाटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. इधाटे यांच्या कोथरुडमधील घरी पोलिसांनी सर्च सुरु केला आहे.