Jayant Patil: "मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला", जयंत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 04:59 PM2024-11-10T16:59:20+5:302024-11-10T17:00:01+5:30
महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले
जुन्नर: केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणुक दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. भाजप व मित्रपक्षाने महागाई वाढवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला असल्याची टीका जयंत पाटील यांनी जुन्नर येथे केली. महविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य घरात घरखर्च करण्याची समस्या भेडसावत आहे. देशात चुकीची राजनीती व आर्थिक नीती सुरू आहे. .जीएसटी मुळे साध्या जीवनावश्यक गोष्टी देखील महागल्या आहेत. राज्य शासन केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्या उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार
शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन मोठा त्याग केला आहे. तसेच ज्येष्ठ नेते शरद लेंडे, अंकुश ढमाले यांनी केलेल्या त्यागाची, उपकाराची जाणीव पक्ष ठेवणार आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. यासाठी त्यांचे मी आभार मानायला आलो आहे . अशी कृतज्ञता जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी
आदीवासी समाजातील कृष्णराव मुंडें यांना शरद पवार यांनी जुन्नर तालुक्याचे आमदार केले . आदिवासी समाजाला जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद असेही जयंत पाटील यांनी सांगितले. पुर्वी जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे व इथले आमदार यांची जोडी होती. ही जोडी आताही एकत्र आहे असे प्रचारात सांगितले जाते. परंतु शरद पवार ,खासदर कोल्हे यांच्यावर टीका केल्याने ही जोडी आता तुटली आहे. आता खासदार कोल्हे व सत्यशील शेरकर ही नवीन जोडी लोकांनी केली आहे. जोड्या लावायला व जोड्या तोडायला लोक हुशार आहे अशी टीप्पणी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
साहेबांच्या आशीर्वादाने विजय निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर तालुक्यात निवडणूक लढवता येत नाही .सद्यस्थितीत पवार साहेबांचा आशीर्वाद सत्यशील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.