मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत: पुणे भाजप महिला मोर्चाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 06:39 PM2021-02-27T18:39:56+5:302021-02-27T18:40:55+5:30
ठाकरे सरकार तीन आघाडी पक्षांचे नसून ते बिघाडाचे सरकार आहे, असा आरोप करून विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या करून अनेक दिवस झाले आहेत. या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. मात्र मुख्यमंत्री पूजाला न्याय देण्याऐवजी त्यांच्या मंत्र्यांना वाचवत आहेत. तत्काळ राठोड यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत पुणे भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
पुणे भाजप महिला मोर्चाच्या वतीने आशिष गार्डन ते कोथरूड पोलीस स्टेशनपर्यंत शनिवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यां महिलांनी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्षा अर्चना पाटील, सरचिटणीस आशा बिववे, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार, संगीता राजगुरू, वृषाली दुबे आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या.
आंदोलनकर्त्या महिला म्हणाल्या, हे सरकार तीन आघाडी पक्षांचे नसून ते बिघाडाचे सरकार आहे. असा आरोप करून विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करीत नाही. याचा निषेध केला जात आहे. राठोड यांच्यावर जोवर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत आंदोलन केले जाईल.
आजचे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत. जर यावर काही काही निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची दिशा बदलाली जाईल, असा इशारा देखील आंदोलनकर्त्यां महिलांनी यावेळी दिला.