मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीमथडी जत्रेचे निमंत्रण; जत्रेतून शरद पवारांचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 12:36 IST2024-12-22T12:35:09+5:302024-12-22T12:36:21+5:30
राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार व काश्मीर आदी राज्यातून हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तुंना पुणेकरांची पसंती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीमथडी जत्रेचे निमंत्रण; जत्रेतून शरद पवारांचा फोन
किरण शिंदे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यातील भीमथडी जत्रेला हजेरी लावली. शरद पवारांनी जत्रेतील अनेक स्टॉलवर जात पाहणी केली. तेथील विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेतली. आणि त्यानंतर शरद पवारांनी भीमथडी जत्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावत भीमथडी जत्रेत येण्याचे निमंत्रण दिल्याची ही माहिती आहे.
दरम्यान पुण्यात यावर्षीही मोठ्या दिमाखात १८ व्या भीमथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भीमथडीत असलेल्या विविध दालनातील सिलेक्ट दालनात विविध १३ राज्यांमधील ३१ स्टॉल असून त्यामध्ये महिला बचत गटाच्या व त्या ठिकाणची संस्कृती जपणाऱ्या विविध वस्तू पुणेकरांना आकर्षून घेताना दिसत आहे. राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार व काश्मीर आदी १३ राज्यातील, हस्तकलेच्या माध्यमातून बनविलेल्या विविध उपयोगी वस्तुंना पुणेकरांनी पसंती दिली.
यंदाच्या भीमथडीत देवराईमध्ये सुमारे १२० प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड केली आहे. देवराईमुळे देशी वृक्षांचे मुबलक बीज तयार होते. देवराई मुळे गावागावात देवराई तयार झाल्यास ऑक्सिजन बँक, निसर्गातील विविध परीसंस्थाना संरक्षण, निसर्गाचा समतोल, किडे मुंग्या यांना आश्रय व खाद्य, शेती उत्पनात वाढ असे विविधांगी फायदे त्याच गावाला मिळतात. याशिवाय भीमथडीत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांचे स्टॉलमध्ये महाराष्ट्रातील आदिवासींच्या शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, आदिवासींच्या सहकारी संस्था आदींच्या माध्यमातून बनवलेल्या विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत.