.....म्हणून 'पुण्याचे' खासदार खास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडले कोडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:13 PM2018-11-16T19:13:35+5:302018-11-16T19:14:29+5:30
लोकसभा सुरू असताना पूर्णवेळ कामकाजात सहभागी होणारे खासदार म्हणून अनिल शिरोळे यांचे विशेष कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे : लोकसभा सुरू असताना पूर्णवेळ कामकाजात सहभागी होणारे खासदार म्हणून अनिल शिरोळे यांचे विशेष कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे,शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, खासदार शिरोळे मितभाषी आहेत पण आग्रही आहेत. त्यांना हव्या त्या कामाचा पाठपुरावा ते सातत्याने करतात. अनेकदा ज्या खासदारांना आपण निवडून पाठवतो ते महत्वाचे विषय सुरू असताना ते कॅन्टीनमध्ये बसतात किंवा फिरत,बसतात. मुख्य विषयाच्या चर्चेवेळी अनेकदा खासदार तिथे नसतात. महाराष्ट्रात विधानसभेत गिरीश बापट ही संसदीय कार्यमंत्री आहेत. आम्ही अनेकदा आमदार नसले तर आम्ही त्यांना विचारत असतो. पण शिरोळे यांच्याबाबत गमतीने असे सांगितले जाते की, ''लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सफाई कामगारांसोबत येतात आणि कामकाज संपल्याव त्यांच्यासोबत जातात बाहेर पडतात'. इतका वेळ देऊन संसदेत ते नुसते बसत नाहीत तर अत्यंत हिरीरीने मुद्दे मांडतात, कामात सहभागी होतात असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शिरोळे यांची या बाबतीत स्तुती केली.दरम्यान या कार्यक्रमात शिरोळे यांनी गर्दी जमावत लोकसभेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे बघायला मिळाले. गच्च भरलेले प्रेक्षागृह, शहरातील सर्व आमदारांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करत त्यांनी ताकद दाखवून दिली.