मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने आणि कारवाईच्या धास्तीने पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:31 AM2019-01-17T01:31:01+5:302019-01-17T01:31:30+5:30

पाणी तोडले : जलसंपदा प्राधिकरणाच्या अवमानाची अधिकाऱ्यांना भीती

The Chief Minister did not have a written order and he stopped the water | मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने आणि कारवाईच्या धास्तीने पाणी बंद

मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने आणि कारवाईच्या धास्तीने पाणी बंद

Next

पुणे : पुण्याच्या पाण्यात कपात करणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाºयांना दिले. मात्र, त्याबाबत लेखी आदेश दिले नाहीत. त्यामुळे जलसंपदा प्राधिकरणाकडून कारवाईच्या भीतीने जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी पुण्याचे पाणी तोडल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्र्यांसह सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांकडून ठोस भूमिका घेतली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असतानादेखील पुणेकरांना हक्काचे पाणी मिळत नसताना पाणीकपातीबाबत ‘ब्र’ शब्द न काढणाºया आयुक्त सौरभ राव यांनी तब्बल १५ टक्के पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव ठेवून पुणेकरांच्या जखमेवर मीठच चोळले आहे.


पुणेकरांना प्रत्येक दिवस २४ तास समान पाणीपुरवठा करण्यात येणार असून, यासाठी राबविण्यात येणाºया योजनेचा खर्च काढण्यासाठी पुणेकरांना गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्यात येत आहे. यंदा चांगला पाऊस होऊन शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पातील सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. परंतु त्यानंतर राज्यात व पुणे जिल्ह्यातील दुष्काळाच्या शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानेदेखील शहराला यापुढे लोकसंख्येनुसारच पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय दिला. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा व लोकप्रतिनिधींच्या गळचेपी भूमिकेमुळे गंभीर पाणीसंकट उभे राहिले आहे.

पाणीकपातीचा घटनाक्रम
कालवा समितीच्या बैठकीनंतरदेखील महापालिका मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने महापालिकेला कोणती ही पूर्वकल्पना न देता बुधवारी (दि. ११) दुपारी चार वाजता पोलीस बंदोबस्तात तीनपैकी दोन पंप बंद करून केवळ एकच पंप सुरू ठेवला. यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याबाबत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यानंत पाटबंधारे विभागाने नियमित पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले. परंतु एकूण तीनपैकी केवळ दोन पंप सुरू केले होते.

महापालिकेला वेळोवेळी लेखी पत्र देऊनदेखील मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलते, असे सांगत पाटबंधारे विभागाने पुन्हा महापालिकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता पर्वती आणि होळकर उपसा केंद्रातील पाण्याचे गेट बंद केले होते. यामुळे
दोन ते तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आदेश देऊनदेखील पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून कारवाईची शक्यता व्यक्त करीत महापालिकेला अंधारात ठेवत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा बंद केला.

पाटबंधारे विभागाच्या कारवाईमुळे या भागाला फटका
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र. ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.



जलसंपदाच्या मुजोर अधिकाºयांना महापौर जाब विचारणार

पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सुरू असून, कोणतीही पूर्वकल्पना न देता बुधवारी (दि. १६) अचानक शहराचा पाणीपुरवठा बंद केला. जलसंपदा विभागाच्या या मनमानी कारभाराचे तीव्र पडसाद महापालिकेच्या वर्तुळात उमटले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगूनदेखील अधिकारी ऐकत नसतील तर मुजोर अधिकाºयांवर कारवाई करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक स्वत: गुरुवारी सिंचन भवन येथे जाऊन अधिकाºयांना जाब विचारणार आहेत. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना शहरामध्ये फिरकू देणार नाही, असा इशाराही टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
महापालिका कालवा समिती व जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा दाखला देत पाटबंधारे विभागाने गेल्या काही दिवसांत तीन वेळा अचानक शहराचा पाणीपुरवठा बंद केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, शहरात पाणीकपात करण्यात येऊ नये, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपाच्या सर्व पदाधिकाºयांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. पुणे दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असे थेट आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले होते. त्यानंतरदेखील पुण्यातील पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार सुरूच असून, बुधवारी (दि. १६) दुपारी पर्वती पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा अचानक बंद केला. महापौर टिळक यांनी याप्रकरणी जलसंपदामंत्री यांच्याशी संपर्क साधून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: The Chief Minister did not have a written order and he stopped the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.