मुख्यमंत्र्यांकडे ‘एक्झॅक्ट’ आकडा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:25 AM2019-09-16T05:25:32+5:302019-09-16T05:25:55+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे परिसरात पाच वर्षांत किती गुंतवणूक आणि किती रोजगार निर्माण झाले, या प्रश्नाचे नेमके उत्तर देता आले नाही.
पुणे : रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे परिसरात पाच वर्षांत किती गुंतवणूक आणि किती रोजगार निर्माण झाले, या प्रश्नाचे नेमके उत्तर देता आले नाही. ‘एक्झॅक्ट’ आकडा नाही. परंतु, आनंदाची बाब ही आहे, की सर्वाधिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती पुण्यात झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देशात निर्माण झालेल्या एकूण रोजगारांपैकी २५ टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात तयार झाले. गुंतवणूक करार प्रत्यक्षात येण्याचे देश पातळीवरचे प्रमाण ३५ टक्के आहे तर महाराष्ट्रात हेच प्रमाण ४५ टक्के आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पुण्यात मुख्यमंत्र्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी जाहीर करावी - चव्हाण
रोजगारनिर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री प्रामाणिक असतील तर महाराष्ट्रात विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी त्यांनी जाहीर करावी, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
रोजगाराच्या आकड्यांबाबत विपर्यास करून मुख्यमंत्री एकप्रकारे जनतेसोबत लबाडी करीत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील ६ लाख उद्योग बंद पडले असून, त्यात राज्यातील सुमारे १ लाख ४१ हजार उद्योगांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेली २४ हजार शिक्षकांची आणि ७२ हजार शासकीय पदांची मेगाभरती पूर्ण झालेली नाही.
>‘होर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही’
महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर तिकीटासाठी इच्छुक भाजप कार्यकर्त्यांनी शहरभर फ्लेक्स-होर्डिंग लावून शहर विद्रूप केले. यासंबंधी विचारले असता, अशाप्रकारे होर्डिंग लावणे चुकीचे असून होर्डिंग लावल्याने कोणालाही तिकीट मिळत नाही तर काम पाहूनच तिकीट देणार असल्याचे ते म्हणाले.