बदला घेण्यापेक्षा बदल घडविण्यास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:52 AM2022-11-21T10:52:04+5:302022-11-21T10:55:11+5:30
पिंपरी : गेल्या चार महिन्यांत राज्यात आपले, सर्वसामान्यांचे सरकार आहे. मनात कोणतीही अढी न ठेवता काम सुरू आहे. अनेक ...
पिंपरी : गेल्या चार महिन्यांत राज्यात आपले, सर्वसामान्यांचे सरकार आहे. मनात कोणतीही अढी न ठेवता काम सुरू आहे. अनेक जनहिताचे निर्णय घेतले. माझ्या प्रवासात जे भेटले त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. जे भेटले नाही तेही भविष्यात निश्चितच भेटतील. पाहतो, सांगतो, करतो, असा माझा स्वभाव नाही. होणारे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो. बदला घेण्यापेक्षा बदल घडविण्याविण्यास प्राधान्य दिले जाते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे रविवारी व्यक्त केले.
मराठी पत्रकार परिषद मुंबई संस्थेच्या ४३ व्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, विश्वस्त एस. एम. जोशी, किरण नाईक आदी उपस्थित होते. नाना कांबळे यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांविषयी मनोगत व्यक्त केले. मनोहर चिवटे पुरस्कार संदीप आचार्य यांना प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता एक चळवळ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. अडीच वर्षांपासून मंदावलेल्या राज्याच्या विकासाला चालना देत आहे. शेतकऱ्यांना मदत, पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले, यासह राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकांना भेटत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहे.’
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरीब नागरिकांना मदत करण्यात येते. मात्र, यापूर्वी ही मदत अवघी २५ हजार रुपये होती. विविध गंभीर शस्त्रक्रियांसाठी ही रक्कम तुटपुंजी होती. यामध्ये वाढ करून तीन लाख रुपये केले आहेत. त्यासोबतच साहित्य संमेलनाच्या धर्तीवर पत्रकार अधिवेशनास २५ लाख देण्यासंदर्भात निर्णय घेऊ.’