मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
By नितीन चौधरी | Published: April 11, 2024 06:52 PM2024-04-11T18:52:04+5:302024-04-11T18:52:25+5:30
अजित पवार, राज ठाकरे हे आमच्यासोबत असल्याने देशात मोदी लाट निर्माण होऊन महाराष्ट्रात सर्व जागा जिंकून महायुती निवडून येईल
पुणे: “कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम जगभर पोचले आहे. मात्र, राज्यात त्यावेळी मोदी यांच्यावर घरात बसून टीका करण्यात आली. मोदी त्याकडे लक्ष देत नव्हते. मात्र, मोदींनी वक्रदृष्टी केल्यास काय होईल? फेसबुकवरून लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल,” असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. मोदींवरील टीकेवरून त्यांनी हाथी चला बाजार... ही म्हण उद्धृत करीत ठाकरे यांना नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यानेच लोकांच्या मनातील युती सरकार स्थापन केल्याचा दावा करत शिंदे यांनी, ‘हे सरकार पडणार,’ अशी टीका त्यावेळी सुरू झाल्याचे सांगितले. आता मात्र, ही टीका बंद झाली आहे. विकासाचे व्हिजन घेऊनच देश व राज्य विकास प्रगतीकडे वाटचाल करत आहे. हे मुद्दे लक्षात घेऊनच अजित पवारदेखील युतीत सामील झाले आहेत. आता मनसेनेदेखील याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशात मोदी लाट निर्माण झाल्याचे सांगत राज्यात ४८ पैकी ४५ जागा जिंकून महायुती निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदानात बुथ कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत मतदारांना मतदानासाठी बाहेर काढावे लागेल, असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. विरोधक मतदारांची दिशाभूल करतील. त्याकडे लक्ष ठेवावे लागेल. त्याला उत्तर देताना आपल्याकडून बोलण्यात काहीही चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. अजित पवारांना याचे अनेक अनुभव आले आहेत. असे शिंदे यांनी सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. पवार यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवावी असेही ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारने अनेक निर्णय सामान्यांसाठी घेतले असून मतदारांसमोर जाताना कार्यकर्त्यांना खाली मान घालण्याची काम ठेवलेले नाही असे सांगून शिंदे यांनी मते मागताना मतदार आपल्याला रागावेल. मात्र तो आपल्यालाच मतदान करेल असा विश्वासही कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.