विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By श्रीकिशन काळे | Updated: January 25, 2025 19:35 IST2025-01-25T19:35:09+5:302025-01-25T19:35:30+5:30

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार

Chief Minister inaugurates World Marathi Conference | विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुण्यात होणाऱ्या विश्व मराठी संमेललाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालय, अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भुषण पुरस्कार’ प्रदान केला जाईल. तर, रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्काराने सांगता समारंभात सन्मानित केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, संमेलन नगरीला पु. ल. देशपांडे यांचे, तर व्यासपीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ यंदा फर्ग्युसन महाविद्यालयात होत आहे. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘३१ जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात हे संमेलन होणार असून, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाने दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांच्या काही अडचणी असल्यास, त्यांनी त्या आमच्याकडे मांडाव्यात, त्यातून मार्ग काढू.

मराठी विश्वात पोहोचवण्यासाठीच ‘तो’ निर्णय…
विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातूनही मराठी बांधव किंवा साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने यावे, मराठीचा डंका जगाच्या पाठीवर वाजावा, असा आमचा हेतू आहे. त्यामुळेच संमेलनाला अमेरिकेतून येणाऱ्या व्यक्तीला ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर, युरोपमधून येणाऱ्यांना ५० हजार आणि दुबईमधून येणाऱ्यांना २५ हजार रुपये दिले जाणार आहे. या खर्चावर टीका करण्यापेक्षा उद्देश समजून घ्यावा, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

‘पुस्तक आदान-प्रदान उपक्रम’
आपल्या जवळील पुस्तक देऊन, दुसरे पुस्तक घेऊन जाण्याचा ‘पुस्तक आदान-प्रदान उपक्रम’ या संमेलनात राबवला जाणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

२५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तके देणार
संमेलनात विविध शाळा, महाविद्यालयातील २५ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यांना प्रत्येकी एक पुस्तक भेट दिले जाणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाकडून ही पुस्तके दिली जाणार आहेत.

Web Title: Chief Minister inaugurates World Marathi Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.