वाळूउपशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 12:40 AM2016-06-25T00:40:38+5:302016-06-25T00:40:38+5:30

‘श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर अवैध वाळूउपसा प्रकरणासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. २३) प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची थेट मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतली आहे.

Chief Minister of the sand side interference | वाळूउपशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

वाळूउपशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Next

इंदापूर : ‘श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर अवैध वाळूउपसा प्रकरणासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. २३) प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची थेट मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतली आहे. पुढच्या तीन-चार दिवसांत ते नीरा-नृसिंहपूरला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय यंत्रणेकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती तत्काळ मागवली आहे. महसूल विभागाने नीरा-नृसिंहपूर येथील मानकेश्वर वाड्यात छापा टाकून दीड लाख रुपये किमतीचा २२ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला आहे. इंदापूर पोलिसांनी साठा करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी मंगळवारच्या ‘वाळू व्यावसायिक मारहाण प्रकरणा’तील मुख्य आरोपी व नीरा-नृसिंहपूर गावचा माजी सरपंच आहे.
सविस्तर हकीकत अशी : वाळू काढण्याच्या कारणावरून दोन गटांत श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर येथे मंगळवारी (दि. २१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सशस्त्र हाणामारी झाली होती. त्यामध्ये श्रीहरी मासुळे व नीलेश कोळी हे दोघे जण जखमी झाले होते. मासुळे याची प्रकृती गंभीर आहे. परस्परांविरुद्ध तक्रारी देण्यात आल्या होत्या. नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सात जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सविस्तर बातमी छायाचित्रासह ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. बातमी आल्यानंतर महसूल यंत्रणेने गतिमान हालचाली केल्या.
नीरा- नृसिंहपूरचे तलाठी अण्णाराव वसंत मुळे, बावड्याचे मंडलाधिकारी रवींद्र दशरथ पारधी यांनी नीरा-नृसिंहपूर गावच्या हद्दीत मानकेश्वर वाडा येथे नरहरी जगन्नाथ काळे व हनुमंत पांडुरंग काळे (दोघे रा. नीरा-नृसिंहपूर) यांनी अवैध स्वरुपात केलेला २२ ब्रास वाळूसाठा जप्त केला. बेकायदा साठा करणे व पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये या दोघांविरुद्ध काल (दि. २३) इंदापूर पोलीस ठाण्यात मुळे यांनी फिर्याद दिली.
त्यावरून गुन्हा दाखल करून, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी काल रात्री दोन वाजता यातील आरोपी नरहरी जगन्नाथ काळे यास अटक केली. दुसरा आरोपी हनुमंत काळे यास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश इंदापूर न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Chief Minister of the sand side interference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.