मुख्यमंत्र्यांनी गुप्त अहवालाचा खुलासा करावा ; संभाजी ब्रिगेडची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 06:52 PM2018-07-24T18:52:40+5:302018-07-24T18:54:02+5:30
मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप साेडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले हाेते. त्यामुळे ताे अहवाल अाता जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे.
पुणे : काहीं समाजकंटक अाषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वारकऱ्यांमध्ये साप साेडून चेंगराचेंगरी करण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचरा विभागाने दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले हाेते. त्यावर अाता मुख्यमंत्र्यांनी त्यांना देण्यात अालेल्या गुप्त अहवालाचा खुलासा करावा तसेच कुठल्या अधिकाऱ्याने हा अहवाल दिला अाहे हेही जाहीर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे.
मंगळवारी संभाजी ब्रिगेडतर्फे घेण्यात अालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात अाली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनाेज अाखरे, पुणे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे उपस्थित हाेते. मुख्यमंत्री हे गृहमंत्री सुद्धा अाहेत, असे असताना त्यांनी गुप्त अहवाल कसा काय जाहीर केला असा प्रश्न संभाजी ब्रिगेडकडून उपस्थित करण्यात अाला अाहे. तसेच ज्या अधिकाऱ्याने ताे अहवाल पाठवला त्या अधिकाऱ्याचे नाव मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगावे. अशी मागणीही अॅड मनाेज अाखरे अाणि संताेष शिंदे यांच्याकडून करण्यात अाली अाहे.
संताेष शिंदे म्हणाले, जाणीवपूर्वक वारीला जायचं टाळायचं अाणि त्याचं खापर खाेटं बाेलून अांदाेलन करणाऱ्यांवर फाेडायचं काम मुख्यमंत्री करत अाहेत. जर गुप्तचर विभागाकडून अालेला कथित अहवाल खाेटा ठरला तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. मराठा अारक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल न घेतल्यास अामदार, खासदार यांनाही घेरणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात अाला अाहे.