धनगर आरक्षणाबाबत फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:30 PM2018-06-19T16:30:10+5:302018-06-19T16:30:10+5:30
धनगरांच्या भावनेशी खेळण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व आरक्षणाच्या बाबतीत केलेल्या फसवणुकीबद्दल धनगर समाजाची जाहीर माफी मागावी," अशी मागणी समस्त धनगर आरक्षण समितीचे ज्येष्ठ नेते श्रावण वाकसे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुणे : "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी चौंडी, अहमदनगर येथे झालेल्या गोंधळानंतर राज्याच्या गृहविभागाने आकसापोटी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या चार वर्षांपासून धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ आश्वासने देत आहेत. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. आता महादेव जानकर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावून धनगरांच्या भावनेशी खेळण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व आरक्षणाच्या बाबतीत केलेल्या फसवणुकीबद्दल धनगर समाजाची जाहीर माफी मागावी," अशी मागणी समस्त धनगर आरक्षण समितीचे ज्येष्ठ नेते श्रावण वाकसे यांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी युवानेते शिवकुमार देवकाते, धनगर समाज संघटक अप्पासाहेब करे, धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते उत्तम मदने, जयश्री वाकसे, रूपल वाकसे, शिवाजी वाडीकर, दीनानाथ वाकसे आदी उपस्थित होते.
श्रावण वाकसे म्हणाले, "चौंडी येथील सभेवेळी झालेल्या गोंधळानंतर धनगर समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी गोंधळ झाल्याने दगडफेक झाली. त्यानंतर १०० समाजबांधवांवर खोटे दाखल करण्यात आले. त्यातही काहीजणांना त्याचदिवशी सोडण्यात आले व काहींना नंतर सोडण्यात आले. प्रसिद्ध डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यासह उर्वरित १६ जण आजही कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात आहेत. त्यांना ३०७ या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, समाज या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभा असून, त्यांना त्वरित जामीन द्यावा व त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. कार्यकर्त्यांची सुटका झाली नाही आणि गुन्हे मागे घेतले नाहीत, तर धनगर समाज आक्रोश आंदोलन करणार असून, मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करेल."
"धनगर समाजाला भुलवून मते मिळवण्याचा प्रयत्न आतापर्यंत सगळ्यांनीच केला आहे. ३० मे २०१८ पर्यंत धनगर आरक्षणाबाबत अल्टिमेटम देण्यात आला होता. या प्रलंबित मागण्यासाठी समाजातील सुशिक्षित लोक आवाज उठवत असताना राज्याच्या गृहविभागाकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. चौंडी येथेही हाच प्रकार झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने केवळ वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. एवढेच नाहीतर, अहिल्या भक्तांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईचा बडगा उगारून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. हे गुन्हे आकसापोटी आणि जाणूनबुजून दाखल केले आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. हा गोंधळ आयोजकांनी पूर्वनियोजित घडवून आणला असल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे आयोजकांवर कारवाई व्हावी. डॉ. इंद्रकुमार भिसे, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी," असे वाकसे म्हणाले.