खास सभा तहकूब, शिवसृष्टीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:00 AM2017-10-04T07:00:54+5:302017-10-04T07:01:19+5:30
शहरातील प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तसे स्पष्ट करीत या विषयासाठी बोलावलेली खास सभा मंगळवारी तहकूब केली.
पुणे : शहरातील प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तसे स्पष्ट करीत या विषयासाठी बोलावलेली खास सभा मंगळवारी तहकूब केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सर्व संबधितांची संयुक्त बैठक घेऊन त्यात याबाबत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
कोथरूड येथे मेट्रो स्थानकासाठीच्या जागेवर शिवसृष्टी तयार करण्याची मागणी शहरात जोर धरत आहे. माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी यामागे शिवप्रेमी संघटनांचा पाठिंबा उभा केला आहे. महापालिकेच्या त्यासाठी आतापर्यंत दोन खास सभा झाल्या. त्यात या विषयावर बरीच चर्चा झाली व नियोजित शिवसृष्टीला सर्वपक्षीय पाठिंबा व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी याची दखल घेत मुंबईत मेट्रोचे अधिकारी व महापालिका पदाधिकारी यांची खास बैठक घडवून आणली. या बैठकीत मेट्रो साठीच्या २८ एकर जागेवर काही भागात स्थानक तसेच काही भागात शिवसृष्टी असे करणे शक्य आहे, याची तंत्रज्ञांमार्फत चाचपणी करण्याचे ठरले आहे. तसेच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, काही तंत्रज्ञ व महापालिका पदाधिकारी अशी संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचा निर्णयही त्यावेळी झाला.
मात्र दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौºयावर असल्याने अशी बैठक झालीच नाही. मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्याला गतीही दिली जात आहे, शिवसृष्टीचा निर्णय मात्र व्हायला तयार नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत जास्तीत जास्त लवकर बैठक घडवून आणावी, अशी मागणी सभेत मानकर यांनी केली. सर्वपक्षीय पाठिंबा मिळालेला असताना शिवसृष्टीच्या निर्णयाला वेळ का लावला जात आहे, अशा विचारणा विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. मुख्यमंत्र्यांसमवेतच्या नियोजित बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबरच सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. अश्विनी कदम यांनी याबाबत नक्की काय झाले आहे, याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. त्यावर महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून येत्या महिनाभरात यासंबधीचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.