मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:24+5:302021-06-27T04:09:24+5:30
पुणे : जोपर्यंत उपेक्षितांची सत्ता येत नाही तोपर्यंत त्यांचे अधिकार, हक्क चिरडले जाणार. पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणे हे राजर्षी शाहू ...
पुणे : जोपर्यंत उपेक्षितांची सत्ता येत नाही तोपर्यंत त्यांचे अधिकार, हक्क चिरडले जाणार. पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणे हे राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक वारसांना शोभणारे नाही. या हक्कासाठी येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या निवासाला घेराव घालणार असून प्रसंगी महाराष्ट्र बंद करू, असा इशारा भीम आर्मीचे आणि आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांनी दिला.
आजाद पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेश प्रमुख प्रफुल शेंडे, राहुल प्रधान, नेहा शिंदे, राजेश गवळी आदी यावेळी उपस्थित होते.
आजाद म्हणाले, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी यांना राज्य घटनेच्या कलम १६ (४) अ नुसार पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. राज्य सरकार हे आरक्षण देऊ शकते हे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलेले आहे. परंतु, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत वैचारिक वारसदार म्हणवणाऱ्यांकडून उपेक्षित समाजाची फसवणूक केली जात आहे. सरकारने गैरसमाजात राहू नये. आरक्षण मिळविण्याकरिता तीव्र आंदोलन उभे केले जाईल असे आजाद म्हणाले. मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांने स्पष्ट केले.
लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला त्या प्रमाणात आरक्षण द्यायला हवे. त्यामुळे १०० टक्के आरक्षण लागू करावे असे आजाद म्हणाले. अनुसूचित जाती-जमाती यांनी खुल्या वर्गातून सर्व जागांवर निवडणुका लढविल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा आपले खरे प्रतिनिधी निवडून सभागृहात पाठवावेत. सध्या देशात अघोषित आणीबाणी असून अधिकारांचे दमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.