पुण्याच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची ‘एका वाक्यात उत्तरे’; पुणेकरांची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:35 AM2022-08-03T11:35:36+5:302022-08-03T11:35:43+5:30

मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे पुणेकरांची निराशा वाढविणारी असल्याची चर्चा सुरू

Chief Minister's 'one-sentence answers' to Pune issues; Strong displeasure of Pune residents | पुण्याच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची ‘एका वाक्यात उत्तरे’; पुणेकरांची तीव्र नाराजी

पुण्याच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची ‘एका वाक्यात उत्तरे’; पुणेकरांची तीव्र नाराजी

Next

पुणे : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्याचा दौरा केला. यात पुण्याच्या प्रश्नांविषयी चर्चा होईल आणि ते मार्गी लागतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी केवळ एका वाक्यात उत्तरे दिली. त्यामुळे पुणेकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्याच्या प्रश्नांबाबत विशेष आग्रही हाेते. मात्र, शिंदे यांचा दौरा पुणेकरांची निराशा करणारा ठरला. पुणे विभागाचा आढावा घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुण्याविषयी प्रश्न विचारण्याची अगदी थोडीच संधी मिळाली. यात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे पुणेकरांची निराशा वाढविणारी असल्याची चर्चा सुरू आहे.

- प्रश्न : पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत जलसंपदा विभागाकडून अडवणूक केली जात आहे. शहरात पूर्वी २५ लाख लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा केला जात होता. सध्या शहराची लोकसंख्या ५० लाख झाली असली तरी त्याच प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे?
उत्तर : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ही बाब तपासून घेऊ. संबंधित विभागांना तशा प्रकारचे निर्देश देऊ.”

- प्रश्न : पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ बारामती तालुक्याच्या हद्दीत प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?
उत्तर : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ते तसे नाही. ज्या ठिकाणी पूर्वी मंजुरी मिळाली आहे, त्याच ठिकाणी ते करू.”

- प्रश्न : महापालिकेची निवडणूक सध्या तीन प्रभागांच्या रचनेनुसार होणार आहे. मात्र, सत्ताबदलानंतर चार प्रभागांनुसार निवडणूक होईल, असे तुमच्या पक्षाच्या व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल?
उत्तर : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. तो झाला की तुम्हाला कळेल.”

- प्रश्न : पुणे, खडकी, देहू रोडसह राज्यातील अन्य कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महापालिकांमध्ये विलीनीकरण करावे, असे पत्र राज्य सरकारने संबंधित बोर्ड तसेच संरक्षण मंत्रालयाला दिले आहे?
उत्तर : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हा प्रश्न केंद्र व राज्य सरकारचा आहे. ते पाहून घेऊ.”

- प्रश्न : हांडेवाडी येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या प्रभागातील उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले होते. वाद निर्माण झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला?
उत्तर : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “माझ्या नावाचा उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यास मी कुठेही जात नाही, असे मी त्या कार्यकर्त्याला आधीच सांगितले. त्याने प्रेमापोटी काय केले ते माहिती नाही. या उद्यानाला आता ‘धर्मवीर आनंद दिघे’ असे नाव दिले आहे.”

बैठकीत रिंगरोड, वाहतुकीबाबत सूचना

त्यापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला गती द्यावी. भूसंपादनातील वादाचे मुद्दे लोकअदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने सोडवावेत. वाहतुकीचे नियोजन करताना रिंगरोडला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचा समावेश करावा. पुणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे भरताना तात्पुरते काम न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश दिले. पीएमआरडीएतील एकात्मिक वाहतूक आराखड्याबाबत एक बैठक मुंबईत आयोजित करण्यात येईल, असेही सांगितले.

Web Title: Chief Minister's 'one-sentence answers' to Pune issues; Strong displeasure of Pune residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.