वाड्यांच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:44 AM2018-11-04T01:44:45+5:302018-11-04T01:44:58+5:30
महापालिकेच्या वतीने शहराच्या हद्दीतील जुन्या वाड्यांच्या पुर्नविकासाचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा राज्य शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्म प्रतिसाद दिला आहे.
पुणे - महापालिकेच्या वतीने शहराच्या हद्दीतील जुन्या वाड्यांच्या पुर्नविकासाचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा राज्य शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्म प्रतिसाद दिला आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता वाड्यांच्या एक हजार चौरस मीटर (१० गुंठे) किमान क्षेत्रात पुर्नविकासाला मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिले.
महापालिकेच्या विकास आराखड्यात दाटवस्तीची क्षेत्रे दर्शविण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने जुनी गावठाणे आणि मध्यवर्ती पेठांचा समावेश आहे. या भागात अनेक जुने वाडे असून त्यांची अवस्था अतिशय जीर्ण झालेली आहे. त्यांच्या पुनर्विकासात अडथळे येत असल्याने या भागासाठी क्लस्टर रिडेव्हलपमेंट ही संकल्पना विकास आराखड्यात प्रस्तावित केली होती. यासाठी ३ एफएआय मंजूर करण्यात आला होता. मात्र, शासनाने जानेवारी २०१७ मध्ये या विकास आरखड्यास मान्यता देताना, क्लस्टर रिडेव्हलपमेंट चा निर्णय घेतला नव्हता. या संदर्भांत शासनाने या धोरणाचा इम्पॅक्ट एॅसेसमेंट रिपोर्ट तायर करून पाठविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या.
महापालिकेने निश्चित केलेल्या या धोरणावर राज्यशासनाने काही महिन्यांपूर्वी मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेने क्लस्टरसाठी निश्चित केलेले क्षेत्र हे कमी असल्याने नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या धर्तीवर किमार ४ हजार चौरस मीटर जागेसाठी ही योजना प्रस्तावित करावी त्यासाठी महापालिकेने या दोन्ही शहरांच्या धोरणाच्या आधार घ्यावा अशा सूचना नगर विकास विभागाने महापालिकेस केल्या होत्या. मात्र, शहरातील वाडयांचे आकारमान लहान आहे. तसेच मध्यवर्ती भागातील शहरातील रस्तेही लहान आहेत. अशा स्थितीत पुणे शहराचा स्वतंत्र विचार करून १ हजार चौरस मीटर किमान क्षेत्राबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.