मुख्यमंत्र्यांचे पुणे दौरे वाढले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 01:56 AM2018-11-16T01:56:00+5:302018-11-16T01:56:20+5:30
पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक लक्ष घातले आहे. यामुळेच गेल्या काही ...
पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक लक्ष घातले आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे दौरे वाढविले असून, विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा झपाटा लावला आहे. याचा एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.१६) शहरातील तीन विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
पुणेकरांनी भाजपावर विश्वास दाखवून शहराची संपूर्ण सत्ता भाजपाच्या हातात दिली. यामुळे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्याकडे विशेष लक्ष आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे अध्यक्षपद फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची ते नियमित माहिती घेतात, लक्ष देतात. मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड आदी प्रकल्पांचा मुख्यमंत्री नियमित आढावा घेतात. याशिवाय शहराचे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह अन्य सर्वच प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. यामुळे स्थानिक नेत्यांपेक्षा शहर भाजपाकडून थेट मुख्यमंत्र्यांनाच कार्यक्रमासाठी बोलावण्यात येत आहे. मुख्यमंत्रीसुध्दा पुण्याला अधिकवेळ देत असल्याचे समोर आले.
पुण्यातील प्रमुख कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मेट्रोच्या उड्डाणपुलासोबतच अन्य वाहनांनाही उपयुक्त ठरणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. पीएमआरडीएकडून माण येथे टीपी स्किम उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. भाजपामध्ये अन्य वरिष्ठ नेते आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे व पक्षातील अन्य वरिष्ठ मंडळी असताना, मात्र कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्र्यांनाच पसंती देण्यात येते. पुण्यात पक्षाची ताकद मोठी असल्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्री पुण्याच्या राजकारणात अधिक लक्ष घालत आहेत.