मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस अधिसभा निवडणुकीत अखेर शेवटच्या फेरीत विजयी, मोठ्या संघर्षानंतर मिळाला विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:00 AM2017-11-28T05:00:15+5:302017-11-28T05:00:18+5:30
अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरशीच्या झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना बाराव्या फेरी अखेर
पुणे - अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरशीच्या झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना बाराव्या फेरी अखेर पदवीधरच्या जागेवर विजय मिळाला. त्यांना पसंती क्रमांकावर झालेल्या या निवडणुकीत फडणवीस यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचे अंतिम निकाल मंगळवारी पहाटे ३ वाजता जाहीर झाले. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधरच्या १० तर व्यवस्थापन प्रतिनिधींच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडली. अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व्यवस्थापन प्रतिनिधी पदासाठी बिनविरोध निवडून आल्या. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील हे व्यवस्थापन प्रतिनिधी पदावर निवडून आले.
मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनी विद्यापीठ विकास मंच प्रणित एकता पॅनल कडून उमेदवारी दाखल केली होती. ते या निवडणुकीत सहज विजयी होतील असे चित्र निर्माण करण्यात आले असताना प्रत्यक्षात विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठा झगडा करावा लागला.
खुल्या गटातील शेवटच्या ५ जागेवर १२ व्या फेरीनंतर ते विजयी झाले.
विद्यापीठ विकास मंचला धक्का
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना विजयासाठी बाराव्या फेरी पर्यन्त घाम गाळावा लागल्याने राहिल्याने विद्यापीठ विकास मंचला मोठा धक्का बसला.
फडणवीस पहिल्या फेरीत निवडून येतील त्यामुळे जास्तीची पहिल्या पसंतीची मते दुसऱ्या उमेदवारांना देण्याचे नियोजन मंचाकडून करण्यात आले होते. मात्र पहिल्या फेरीत प्रसेनजीत चौथ्या क्रमांकावर राहिले.
अधिसभा निवडणुक अंतिम निकाल
पदवीधर
1. संतोष ढोरे - खुला गट
2. अनिल विखे- खुला गट
3. तानाजी वाघ - खुला गट
4. अभिषेक बोके - खुला गट
5. प्रसेनजीत फडणवीस - खुला गट
राखीव गट :
6. दादासाहेब शिनलकर - ओबीसी
7. बागेश्री मंठाळकर - महिला राखीव
8. विश्वनाथ पाडवी - ST राखीव
9. शशिकांत तिकोटे - SC राखीव
10. विजय सोनावणे - NT राखीव
व्यवस्थापन प्रतिनिधी
विजयी उमेदवार
1. सुनेत्रा पवार - बिनविरोध
2 सोमनाथ पाटील
3. श्यामकांत देशमुख
4. संदीप कदम
5. राजेंद्र विखे-पाटील