साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 07:27 PM2021-05-04T19:27:28+5:302021-05-04T19:28:16+5:30
सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे केले आयोजन
पुणे: साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त आणि भारतभरातल्या सर्वभाषिक प्रायोगिक नाटकमंडळींचे आधारस्तंभ अशोक कुलकर्णी यांचे आज ४ मेला निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. नुकतीच त्यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृतीची गुंतागुत वाढत गेली. त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
अशोक कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण गावात झाले. त्यांनी इंडियन डेमोग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, फायनान्शियल एक्सप्रेस अशा अनेक संस्थांमध्ये महत्वाच्या पदावर काम केले. या काळात त्यांच्या मुंबईतील वास्तव्यात त्यांचा तत्कालीन प्रयोगशील नाटक आणि सिनेमा करणाऱ्या अनेक कलावंतांशी मैत्री झाली. सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, गोविंद निहलानी अशा अनेक दिग्गज कलावंताचा तो सुरवातीचा काळ होता. पुढे अशोक कुलकर्णी वालचंद इंडस्ट्रीज मध्ये महत्त्वाच्या पदावर काम करून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा काळ हा त्यांनी खऱ्या अर्थाने पुन्हा आपल्या आवडीच्या म्हणजेच नाटकाच्या क्षेत्रात व्यतीत करायचे ठरवले. पडद्यामागे उभे राहून त्यांनी गेल्या वीस वर्षांत अतिशय मोलाची कामगिरी निभावली.
परफॉरमिंग आर्ट या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या तरुण रंगकर्मींचा सन्मान करणारी विनोद दोषी फेलोशिप त्यांनी सुरू केली. पुढे तेंडुलकर दुबे फेलोशिप आणि मधू गानू फेलोशिप अशा नावाने ह्या फेलोशिप दिल्या गेल्या आहेत. आजवर ७२ जणांना ह्या फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.
२००८ ते २०२० सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे आयोजन करून पुणे शहराच्या लौकिकात मोलाची भर घातली. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने रंगभूमीच्या इतिहासाचा मागोवा घेणारे ' सीन्स वी मेड', तेंडुलकरांच्या लेखन -नाट्य- चित्रपट कारकिर्दीवर अनेकांनी लिहिलेले 'अजून तेंडुलकर' अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्यातल्या 'प्रायोगिक रंगभूमी- तीन अंक' या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. नाटककारांची प्रयोगशाळा असा 'रंगभान' नावाचा दीड वर्षे चालणारा उप्रकम त्यांनी चालवला. आताच्या कोविडच्या काळात देखील नाटक करणाऱ्या लोकांना उभारी मिळावी. तसेच त्यांनी नव्या पद्धतीने नाटकाकडे पाहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.