धक्कादायक ! भेटवस्तूत आले कोंबडीचे मुंडके, माथेफिरूचा कारनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 07:05 PM2018-04-14T19:05:24+5:302018-04-14T19:43:04+5:30
पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र कॉलनीत जयकुमार भुजबळ वडील मधुकर भुजबळ तसेच आई विमल भुजबळ यांच्याबरोबर राहतात. एका माथेफिरूकडून त्यांना वेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास दिला जात आहे.
पिंपरी : वाढदिवसाच्या आदल्या दिवशी घराच्या आवारात कोणीतरी एक प्लॅस्टिक डबा ठेवतो...डब्यात वरच्या बाजुस खेळाच्या पत्यातील जोकरचे चित्र...जवळच कागदात गुंडाळलेले रक्ताने माखलेले कोंबडीचे मुंडके... हे दृश्य पाहुन जयकुमार भुजबळ हादरून गेले. उद्या वाढदिवस व आदल्या दिवशीच असा काही प्रकार घडल्याने भयभीत झालेल्या जयकुमारने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोटारीच्या दर्शनी भागावर काळा रंग फासून विद्रुपीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. या विकृत व्यक्तीने काळ्याने सुरूवात केली आहे, लाल रंगाने शेवट होईल. अशी धमकीच त्याने बनावट फेसबुक अकाउंट दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून भुजबळ कुटुंबीयांमध्ये असुरक्षितता निर्माण झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र कॉलनीत जयकुमार भुजबळ वडील मधुकर भुजबळ तसेच आई विमल भुजबळ यांच्याबरोबर राहतात. एका माथेफिरूकडून त्यांना वेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास दिला जात आहे. दीड महिन्यांपासून हा त्रास सुरू असून माथेफिरूच्या कृत्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांनी याची गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फेसबुक, इस्टाग्रामवर बनावट खाती उघडून हा माथेफिरू जयकुमार भुजबळ यांना उद्देशून वेगवेगळ्या पोस्ट करू लागला आहे. अश्लील, धमकावणारा मजकूर तसेच काही विचित्र छायाचित्र पाठवुन जयकुमार यांना सतावले जात आहे. जयकुमार यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माथेफिरूने भेटवस्तूच्या डब्यात एकच जोकरचे चित्र असलेला पत्ता ठेवला होता. दुस-या दिवशी जोकरचा पत्ता वगळता, अन्य पत्ते त्याने त्यांच्या मोटारीजवळ टाकले.
जयकुमार पिंपळे गुरवला राहतात. परंतु, कामानिमित्त ते रोज चिंचवडला जातात. त्यांच्यावर पाळत ठेवून माथेफिरूने चिंचवड येथे जावून जयकुमार यांच्या मोटारीवर दर्शनी भागावर रंग टाकला. घराच्या परिसरात विविध ठिकाणी पत्यातील जोकरची चित्र चिटकवली. बनावट खात्यावरून तो जयकुमार यांच्या मित्रांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागला आहे. त्यावर भुजबळ यांची बदनामी होईल, अशी माहिती शेअर करू लागल्याने भुजबळ कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याबाबत परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, भुजबळ कुटुंबीयांना भयभीत करणारा माथेफिरू त्यांना ओळखणाऱ्यांपैकी असावा, असा अंदाज आहे. लवकरच त्याची माहिती मिळवून योग्य ती कारवाई केली जाईल.