संक्रांतीमुळे चिक्की गुळ व तीळाच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:41+5:302020-12-26T04:09:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मकर संक्रांत वीस दिवसांवर आल्याने सध्या मार्केट मध्ये तीळ, शेंगदाणे, गुळाची प्रामुख्याने चिक्की गुळाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मकर संक्रांत वीस दिवसांवर आल्याने सध्या मार्केट मध्ये तीळ, शेंगदाणे, गुळाची प्रामुख्याने चिक्की गुळाची मागणी वाढली आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका तीळ उत्पादक शेतक-यांना बसला असून, काढणीला आलेला तीळ भिजल्याने मालाचा दर्जा घसरला आहे. अवकाळीचा फटका आणि मागणी वाढल्याने तीळाच्या दरात चांगलीच तेजी आली आहे. तर या उलट यंदा साखर व गुळाचे मुबलक उत्पादन झाल्याने मागणी वाढून देखील गुळाचे दर यंदा स्थिर असल्याची माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.
यंदा राज्यात गुळ - साखरेचे भरपूर उत्पादन झाले आहे. दर वर्षी मकर संक्रांती निमित्त 15 ,डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान गुळाला म्हणजेच चिक्की गुळाला चांगली मागणी असते. पुण्यात प्रामुख्याने केडगांव, कराड आणि सांगली येथून पॅकिंग स्वरूप चिक्कीचा गुळ विक्रीसाठी येतो. सध्या बाजारात बॉक्स पॅकिंग एक किलो गुळाला घाऊक बाजारात 42 ते 46 रुपये दर मिळत आहेत. तर खुला चिक्की गुळ 37 ते 40 रुपये किलोने विकला जात आहे. तर घाऊक बाजारात तीळाचे दर 112 ते 140 किलो पर्यंत वाढले आहे. यात आणखी 10 टक्के वाढ होऊ शकते.
-------
कोरोनामुळे आफ्रिकेतील तीळच्या आयातीवर परिणाम
भारतात उत्पादन होणा-या तीळा सोबतच भारतात मोठ्या प्रमाणात आफ्रिकेतून तीळ आयात केला जातो. हाच आयात केलेला तीळ पॉलिश व पॅकिंग करून भारत निर्यात देखील करतो. परंतु कोरोनामुळे बदरामध्ये कंटेनर मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. यामुळे आफ्रिकेतून आयात होणारा तीळ कमी झाला आहे. तर भारतात ऐन काढणीच्या वेळी आवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे मालाचा दर्जा घसरला आहे.याचा परिणाम दरावर झाला आहे.
- अजित बोरा, तीळाचे व्यापारी
-------
संक्रांतीमुळे गुळ, तीळाची आवर्जून खरेदी
मकर संक्रांत आणि त्यानिमित्त होणारी हळदी कुंकवाचे कार्यक्रमामुळे मोठ्याप्रमाणात तीळाची चिक्कीचे वाटप करावे लागते.यासाठी दर वर्षी संक्रांती निमित्त तीळ व गुळाची आवर्जून खरेदी केली जाते. यंदा कोरोनामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावर मर्यादा आली आहे. तरी घरगुती चिक्कीसाठी तरी गुळ, तीळाची खरेदी केली आहे.
- मंजुश्री राऊत, गृहिणी, बाणेर
-------
गुळ-साखरेच्या किमती स्थिर
यंदा राज्यात, देशात साखर व गुळाचे मुबलक उत्पादन झाले आहे. यामुळे मागणी वाढवून देखील गुळ व साखरेच्या किमतीत फारशी वाढ झाली नसून, मागणी वाढून देखील बाजारातील साखर - गुळाचे दर स्थिर आहेत.
------
तीळाच्या दरात 15-20 टक्के वाढ
यंदा तीळाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.कोरोना आणि आवकाळी पावसाचा फटका बसल्याने ही दर वाढ झाली आहे.
------