रेल्वे स्थानाकातून बालिकेचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:29 AM2018-05-23T03:29:41+5:302018-05-23T03:29:41+5:30
पाच वर्षांची मुलगी : पोलिसात गुन्हा दाखल
पुणे : पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारातून पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री जयसिंग चव्हाण (वय ५) असे बेपत्ता झालेल्या बालिकेचे नाव आहे. ही मुलगी ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाली होती, त्याच ठिकाणाहून ६ फेबु्रवारी २०१८ रोजी एका ८ वर्षांच्या मुलीला एका महिलेने तिच्या पालकांशी गोड बोलून पळवून नेले होते़
याबाबत पोलिसांनी सांगितले, की जयसिंग चव्हाण मजुरी करतात. ते मूळचे नागपूरमधील उमरेड येथील राहणारे आहेत़ अगोदर चुकून ते कुर्डुवाडीला गेले होते़ तेथून ते सोमवारी पुण्यात मजुरीसाठी आले आहेत. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास चव्हाण दाम्पत्य आणि त्यांची दोन मुले पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारात दर्ग्यानजीक थांबले होते. तेथेच त्यांनी आंघोळ केली़ त्यावेळी त्यांची मुलगी जयश्री तेथे खेळत होती. काही वेळानंतर जयश्री तेथून बेपत्ता झाली.
रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात आले़ त्यात ही मुलगी आंघोळ करताना दिसते़ परंतु, त्यानंतर खेळत असल्याचे दिसत नाही़ अन्य सीसीटीव्हीमध्ये ती आढळून आलेली नाही, असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिली.
जयश्री चव्हाण हिने हिरव्या रंगाचा कुर्ता, तसेच पिवळ्या रंगाची सलवार असा पोषाख परिधान केला आहे. तिची उंची तीन फूट असून वर्ण सावळा आहे.
सुटीमुळे रेल्वेस्थानकात खूप गर्दी असल्याने ती नेमकी कोठे गेली, हे समजू शकले नाही़ चव्हाण दाम्पत्याने तिचा रेल्वेस्थानक, एसटी स्थानक आणि ससून रुग्णालयाच्या परिसरात शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. घाबरलेल्या चव्हाण यांनी पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार रात्री उशिरा दाखल केली.