मुलांमधील चंगळवाद कमी करायला हवा : डॉ. आनंद नाडकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:53+5:302021-07-28T04:11:53+5:30
पुणे: आज मुलांना स्वभान लवकर येतंय. पण त्यातून मुलं आत्मकेंद्रित झाली आहेत, कारण पालक आत्मकेंद्रित आहेत. म्हणूनच त्यांच्यातील चंगळवाद ...
पुणे: आज मुलांना स्वभान लवकर येतंय. पण त्यातून मुलं आत्मकेंद्रित झाली आहेत, कारण पालक आत्मकेंद्रित आहेत. म्हणूनच त्यांच्यातील चंगळवाद कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी समतोल जीवनशैली अंगीकारायला हवी, अशी भूमिका मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मांडली. आता कुटुंब आणि समाज एकत्र यायला हवा. कारण पोस्ट पँडेमिक काळात ध्रुवीकरण वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.
‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाने सुरू केलेल्या सामाजिक पालकत्व विभागाच्या उद्घाटनप्रसंगी आॅनलाइन मुलाखतीत ते बोलत होते. पत्रकार उत्तमकुमार इंदोरे व सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता शिंगटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
सामाजिक पालकत्व हा काही नवीन प्रकार नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘‘सामाजिक पालकत्व हे वैयक्तिक पालकत्वाच्या आधीपासून आहे. टोळी काळापासून ते चालत आलेलं आहे. त्यामुळे मुलाला समाजापर्यंत पोहोचवणं आणि मग त्याचं समाजानेही संगोपन करणं या दोन्ही गोष्टी घडायला हव्यात.
मुलांना बेगडीपणा बरोबर कळतो. त्यामुळे त्यांना अस्सलपणा दाखवावा लागतो. त्यासाठी समाजातील चांगुलपणा त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा. मोठ्या मुलांकडून लहान मुलांना शिकवणं, त्यांचं मेंटॉर होणं हे सामाजिक भान देण्यासाठी करायला हवं. रक्ताची नाती आणि सामाजिक नाती दोन्ही महत्त्वाची आहेत. पण जैविक नात्याला असलेलं अवास्तव महत्व कमी करावं असेही ते म्हणाले. ’मिळून सा-याजणी’चा सामाजिक पालकत्व विभाग या कामात सगळ्यांचा समन्वयक बनू शकतो. त्यासाठी समाजात चाललेलं चांगलं काम दाखवणारं व्यासपीठ या विभागाने उपलब्ध करून द्यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘मिळून सा-याजणी’च्या संपादिका डॉ. गीताली वि. मं. यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप मसहूर यांनी आभार मानले.
------------------------------