आईला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:07+5:302021-04-09T04:11:07+5:30
पाटस : जमिनीच्या वाटपासाठी जन्मदात्या मुलाने त्रास दिल्याने आईने कंटाळून गळफास घेतला. याप्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली ...
पाटस : जमिनीच्या वाटपासाठी जन्मदात्या मुलाने त्रास दिल्याने आईने कंटाळून गळफास घेतला. याप्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या मुलाकडून वर्षभरापासून आईवडिलांना मारहाण होत होती.
दत्तात्रय हळंदे (वय २६, हल्ली रा. रामनगर, पुणे, मूळ रा. पाटस, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अशोक हळंदे (हल्ली रा. आळंदी, मूळ रा. पाटस, ता. दौंड) यांनी सख्ख्या भावाच्या विरोधात फिर्याद दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इंदुबाई हळंदे (वय ७०) या महिलेने राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
फिर्यादी अशोक हळंदे हे सध्या आळंदी येथे वास्तव्याला आहे. त्यांना पाटस येथील एका नातेवाईकाने ही घटना कळविल्याने ते तातडीने पाटसला आले असता आईने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्यांना प्रत्यक्षदर्शनी दिसले. नातेवाईकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तुझा धाकटा भाऊ दतात्रय हा मंगळवारी (दि.६) पुण्याहून पाटसला आला होता. यावेळी त्याने जमीन वाटपावरून आईवडिलांशी भांडण करून गेला. त्यांना मारहाण केली असल्याचे सांगितले. दरम्यान माझा धाकटा भाऊ दत्तात्रय हा गेल्या एक वर्षापासून जमीन वाटपासाठी मारहाण करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून आईने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. ए. नागरगोजे अधिक तपास करीत आहे.