बाल दिन विशेष : तंत्रयुगात बालसाहित्यातून व्हावे भावात्मक पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:27 PM2018-11-13T23:27:51+5:302018-11-13T23:28:19+5:30

डॉ. अरुणा ढेरे : सकारात्मकतेचे प्रतिबिंब उमटायला हवे

Child day special: emotional nutrition in childhood | बाल दिन विशेष : तंत्रयुगात बालसाहित्यातून व्हावे भावात्मक पोषण

बाल दिन विशेष : तंत्रयुगात बालसाहित्यातून व्हावे भावात्मक पोषण

googlenewsNext

तुमचा बालसाहित्यातील प्रवास कसा झाला?
इंद्रायणी प्रकाशनातर्फे लहान मुलांसाठी चित्रांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले. मी लहानपणापासूनच कवितांच्या ओळी जुळवत होते. मनीमाऊ, मोर अशा चित्रांखाली त्यांनी मला दोन-दोन कवितेच्या ओळी लिहायला सांगितल्या. तेव्हा मी नऊ एक वर्षांची होते. ते पुस्तक ‘छान छान चित्रे’ या नावाने प्रकाशित झाले. माणूस चंद्रावर गेला हे ऐकून वयाच्या तेराव्या वर्षी झालेला अभिमान आणि त्यावरील प्रतिक्रिया म्हणून मी ‘चांदोबा आणि वसुंधरेचा आज मेळ झाला, मानव चंद्रावरी गेला’ अशी गीत स्वरुपाची कविता लिहिली. कॉलेजच्या वयापासून ख-या अर्थाने बालसाहित्य लिहू लागले. माझ्या वडिलांनी ‘संस्कार कथामाला’ या पुस्तकमालिकेची योजना केली होती. अरगडे प्रकाशनाने ती प्रकाशित केली. पदवीचे शिक्षण घेत असताना ‘एका राजाची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतर ज्ञानेश्वर आणि गौतम बुध्द यांची दोन चरित्रे मुलांसाठी लिहिली. हा विषय मी मुलांसाठी हेतूपूर्वक हाताळला.

‘सुंदर जग हे’ हा कवितासंग्रह खूप गाजला. त्याबाबत काय सांगाल?
ल्ल ‘सुंदर जग हे’ हा माझा पहिला कवितासंग्रह. वातावरण, निसर्ग, सण-उत्सवांचे आणि निसर्गाचे बंध या सगळयाची ओळख व्हावी आणि मुलांची निसर्गाशी मैत्री व्हावी, यादृष्टीने कवितांच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्या पुस्तकाला एनसीएआरटीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘मामाचं घर’ हा अगदी अलीकडचा संग्रह आहे. आपल्याकडे कुमारवयीन मुलांसाठी चांगले ललित साहित्य उपलब्ध नाही. ते लक्षात घेऊन अलीकडे माझे लेखन बरेचसे सुटे झाले आहे. सध्या सुरेश एजन्सीकडून दोन-तीन पुस्तकांचे काम सुरु आहे.

मुलांना गुंतवून ठेवणारे बालसाहित्य सध्या उपलब्ध नाही, असे वाटते का?
ल्ल बालसाहित्य मुलांपर्यंत योग्य पध्दतीने पोहोचत नाही, असे वाटते. साने गुरुजींच्या गोष्टी, ना.धो.ताम्हणकरांचा गोट्या, नारायण धारप यांचे विज्ञान जागृत करणारे लेखन, अनुवादित परिकथा, इसापनीती असे साहित्य वाचून आम्ही घडलो, शिकलो. या वयात मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास, भावात्मक विकास व्हायला हवा.
हॅरी पॉटर सिरिज मुलांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. मराठी बालसाहित्यात असे प्रयोग व्हावेत का?
ल्ल मागील पिढीमध्ये साहित्यातून फास्टर फेणेसारखा नायक जन्माला आला. अनेक पिढ्यांना या नायकाने भुरळ घातली. या प्रकारचा नायक मराठीमध्ये पुन्हा निर्माण झाला नाही, तो व्हायला हवा. तंत्रज्ञान आणि वाचनाचा मेळ घालता यायला हवा. सध्याच्या पिढीला गुंतवून ठेवणारे बालसाहित्य निर्माण व्हायला हवे. जगण्याच्या विविध आयामांची बदलाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुलांना त्यांच्या पध्दतीने ओळख करुन दिली पाहिजे.

वाचन संस्कार घरातूनच कशा प्रकारे व्हावेत?
ल्ल कुटुंबे छोटी झाल्यामुळे मुलांना पालक पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. करिअर, नोकरी असा सगळा झगडा करत असताना पालकांकडेच वाचनासाठी वेळ देता येत नाही. सध्याची लहान मुले खूप बुध्दिमान, प्रगल्भ, जाणती आणि समंजस आहेत. त्यांना बौध्दिक खाद्य पुरवणे हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलताना फावल्या वेळामध्ये आपल्या हातात टीव्हीचा रिमोट असण्यापेक्षा पुस्तक असणे, आॅडिओ कॅसेट असणे ही गरजेची गोष्ट बनली आहे. पालकांची वाचनाची सवय पाहूनच मुलांनाही सवय लागेल. गोष्टींची मौखिक परंपरा जवळपास संपली असली तरी आॅडिओ बुक्सच्या माध्यमातून श्रवण परंपरा टिकवून ठेवता येईल.
लहान मुलांवर इंग्रजीचे आक्रमण झाले आहेत. अशा परिस्थितीत भाषेचे संस्कार कसे करता येतील?
ल्ल ज्यांना भाषेविषयी खरोखर आस्था आहे, त्यांनी भाषा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. भाषेचे केवळ जतन करुन किंवा पुस्तकांमधून ती टिकणार नाही. त्यासाठी नेमाने आणि नियमाने मराठी भाषा घरोघरी बोलली गेली पाहिजे. इंग्रजी शिकत असतानाही चांगली मराठी बोलता येते, शिकता येते, वाचता येते. मुलांना हे समजावून सांगितल्यास भाषा सहज टिकू शकते.

बालसाहित्यिकांची संख्या तुलनेने मराठी साहित्यात कमी आहे, असे वाटते का?
ल्ल सध्याच्या काळात बालसाहित्य लिहिणे हे मोठे आव्हान आहे. सोपे लिहिणेच सर्वात अवघड असते. मुलांचे मानसशास्त्र, जगाच्या परिघात वावरताना नव्या मागण्या अशा अनेक आयामांचा विचार करावा लागतो. त्यामुळे बालसाहित्य गौण आहे, असे मानून याकडे तरुण लेखक वळत नसतील तर हा समज बाजूला ठेवला पाहिजे. कारण, बालसाहित्य हाच साहित्याच्या मुख्य प्रवाहाचा पाया आहे.

नव्या पिढीला तंत्रज्ञानाची खूप लवकर ओळख होते आहे. तंत्रज्ञानाची कास धरलेली असताना माणूस म्हणून साहित्यातून त्यांचे भावात्मक पोषणभरण झ्नाले पाहिजे. माणूसपणाचा गाभा विकसित करण्याची गरज पूर्ण करणारे सकस साहित्य त्यांना मिळायला हवे. त्यादृष्टीने आपले साहित्य अजूनही कमी पडते आहे. जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी, माणसांविषयीचे प्रेम, निसर्गाशी जवळीक, मानवी मुल्यांविषयीची आस्था, सार्वजनिक जीवनातील वावर, नागरिकत्वाची जबाबदारी यांचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, अशा शब्दांत नियोजित साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी बालसाहित्याच्या विविध पैलूंना स्पर्श केला. बालदिनाचे औचित्य साधून त्यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद...

प्रज्ञा केळकर-सिंग

Web Title: Child day special: emotional nutrition in childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.