माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:38 PM2020-06-11T19:38:22+5:302020-06-11T19:38:53+5:30
कुटुंबिय,नातेवाइकांची रणवीरच्या बाबतीत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी
बारामती : माळेगांव कारखान्याच्या विहिरीत बुडुन पावणेचार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करत बालकाच्या वडिलांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी मुलाचे वडील अॅड राहुल अशोकराव तावरे (वय ३७ वर्षे, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. रणवीर राहुल तावरे (वय ३ वर्षे १० महिने) असे विहिरीत बुडुन मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. ९ जुन रोजी रात्री ९.४५ ते ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या दिवशी रणवीर हा जेवण करून घरातच खेळत होता. काही वेळाने तो घरात व घराच्या आजुबाजूस नसल्याने अॅड तावरे यांच्यासह घरातील लोकांनी त्याचा सर्वत्र वस्तीवर शोध घेतला ,परंतु तो सापडला नाही. रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास अॅड. तावरे यांचा चुलत भाऊ प्रताप बबन तावरे हा आला. त्याने घरापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या कारखान्याच्या विहिरीमध्ये बॅटरी लावून पाहिले.यावेळी रणवीर विहिरीच्या पाण्यामध्ये पाण्यावर तरंगताना दिसला. त्यास प्रताप तावरे व हर्षवर्धन तावरे यांनी पाण्यातून बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर मुलगा रणवीर याला बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी रणवीर हा पाऊन तासापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. अॅड तावरे यांचे कुटुंबिय,नातेवाइकांनी रणवीर याचे बाबतीत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.