खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू! पुणे महापालिका म्हणते, आम्ही सुरक्षेची काळजी घेतली होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 09:37 IST2025-04-02T09:36:34+5:302025-04-02T09:37:23+5:30
सुरक्षारक्षक ड्यूटीवर असेल तर त्याने मुलाला खड्ड्याकडे जाण्यापासून रोखले का नाही, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत

खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू! पुणे महापालिका म्हणते, आम्ही सुरक्षेची काळजी घेतली होती
पुणे: घोरपडी येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी सर्व प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. असे असतानाही येथील खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू कसा झाला? मुलगा तिथे गेलाच कसा, यांसह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून घोरपडी येथील मिरज लोहमार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपूल खांबासाठी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील बाजूस ठेकेदाराकडून खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र, खड्डा खोदताना मलवाहिनी फुटल्याने खड्ड्यात दूषित पाणी भरले आहे. त्यामुळे काम बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, २९ मार्च रोजी क्रिश सुभाष अंगरकर (९, रा. खान रोड, रेसकोर्सजवळ) या मुलाचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ‘खड्ड्याच्या कामाभोवती पत्र्याचे बॅरिकेडिंग, एका बाजूला मातीचा उंच ढिगारा व सुरक्षारक्षक नेमणुकीस होता, असा दावा महापालिकेने केला आहे. सुरक्षा रक्षक, ठेकेदाराचे कामगार यांच्या व्यतिरिक्त तिथे कोणी जात नाही’, असे स्पष्ट केले आहे. या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती, तर मग तो मुलगा तिथे गेला कसा? सुरक्षारक्षक ड्यूटीवर असेल तर त्याने मुलाला खड्ड्याकडे जाण्यापासून रोखले का नाही, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
घोरपडी उड्डाणपुलाच्या खांबासाठी घेतलेल्या खड्ड्याभोवती पत्र्याचे बॅरिकेडिंग, सुरक्षारक्षक अशा उपाययोजना केल्या आहेत. तरीही, तिथे मुलगा कसा पोहोचला असा प्रश्न आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. तरीही, मुलाच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा काम महापालिकेकडून केले जात आहे. - युवराज देशमुख, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, महापालिका