‘त्या’ बालकाला अजुनही प्रतिक्षा आई वडिलांची
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 08:54 PM2019-06-11T20:54:51+5:302019-06-11T20:55:59+5:30
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेले नवजात बालक ६ महिन्यांपासुन त्याच्या आई वडीलांच्या प्रतिक्षेत आहे.
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेले नवजात बालक ६ महिन्यांपासुन त्याच्या आई वडीलांच्या प्रतिक्षेत आहे.आजही त्याची प्रतिक्षा थांबलेली नाही.जन्मल्यापासूनच त्याच्या नशिबी बेवारशीपणाचे जगणे आले आहे. यासंदर्भात अज्ञात माता पित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुष जातीचे हे बालक १४ डिसेंबर २०१८ रोजी अवघ्या तीन चार दिवसांचे असताना सापडले. स्थानिक नागरीकांनी येथील नगरसेविका रुपाली गायकवाड यांचे पती दिपक गायकवाड यांना या बेवारस रडणाऱ्या बाळाची माहिती दिली. गायकवाड यांनी पोलीसांना या बाबत दिलेल्या माहितीवरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी पोचले. त्यानंतर शहर पोलीसांनी आजुबाजुला चौकशी करुन तत्काळ अर्भकाला ताब्यात घेवून प्राथमिक उपचारासाठी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुन्हा अर्भक पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी महिला पोलीस कर्मचारी प्रेमा सोनवणे यांनी त्या बाळाला आईच्या प्रेमाची ऊब दिली. जागरुक नागरीकांसह पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या नवजात अर्भकाला खऱ्या अर्थाने जीवदान मिळाले.
शहर पोलीस ठाण्याचे धुमाळ यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत मातापित्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शेवटी पोलीसांनी अर्भकास ताब्यात घेवुन पुणे येथील बाल कल्याण समितीला कळविले. त्यानंतर समितीच्या आदेशाने हे अर्भक केडगांव (ता. दौंड) येथील पंडीता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेत तात्पुरत्या संरक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांचे हे अर्भक आता सहा महिन्यांचे गोंडस बालक झाले आहे. त्याचे नाव संस्थेने ‘अभिषेक’ ठेवले आहे. त्यामुळे बालकाच्या नातेवाईकांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या सोशल वर्कर छाया म्हंकाळे यांनी केले आहे.अद्याप त्या निष्पाप बालकाला त्याच्या आई वडीलांची प्रतिक्षा आहे.
... अज्ञात मातापित्यांची निष्ठुरता उघड
नवजात अर्भकाचा कडाक्याच्या थंडीपासुन बचाव होण्यासाठी उघड्यावर सोडुन जाणाऱ्या अज्ञात मातापित्यांनी चांगलीच दक्षता घेतली होती. मखमली कापडात गुंडाळलेल्या बाळाला स्वेटर घालण्यात आला होता. त्यानंतर ‘लव्ह’ लिहिलेल्या उबदार लोकरसदृश्य कापडात बाळाला लोकरी कानटोपीसह गुंडाळुन ठेवले होते. अर्भकाजवळ दुधाने भरलेली बाटली देखील ठेवली होती. मात्र,अर्भकाला उघड्यावर बेवारसपणे सोडुन दिले. सहा महिन्यानंतर देखील त्या बालकाकडे दुर्लक्ष केल्याने अज्ञात मातापित्यांची निष्ठुरता उघड झाली आहे. अज्ञात आरोपी माता पिता यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.