घराला लागलेल्या आगीत बालक होरपळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:35 AM2018-11-29T01:35:39+5:302018-11-29T01:35:45+5:30
आठ लाखांचे नुकसान : संसारोपयोगी वस्तू जळून खाक
वालचंदनगर : शिरसटवाडी पागळेवस्ती (ता. इंदापूर) येथील रामचंद्र लक्ष्मण वाघमारे यांच्या घराला बुधवारी (दि. २८) दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. या आगीत अडीच वर्षांचे बालक गंभीर जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या आगीत नानासाहेब रामचंद्र वाघमारे यांच्याही घराला आग लागल्यामुळे दोन्हीही घरे जळून खाक झाली आहेत. अडीच वर्षाचा गणेश घरात झोपलेला असल्याने या आगीत ८० टक्के भाजला आहे. बारामती येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तो गंभीर असल्याने पुण्याला हलविण्यात आले. दोन्हीही घरातील संसार उपयोगी वस्तूसह जवळजवळ ८ लाख रुपये किमतीचे वस्तू जळून खाक झालेले आहेत. घटनास्थळी गावकामगार तलाठी, पोलीस पाटील संतोष ननवरे यांनी भेट दिली.
शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथील पागळेवस्ती येथे नंदीवाले समाजातील काही घरे आहेत बुधवारी दुपारी घरातील सर्वच वडील माणसे जवळच असलेल्या शेतीवर काम करण्यासाठी गेलेले होते. घरात रामचंद्र वाघमारे यांचा नातू नानासाहेब वाघमारे यांचा मुलगा गणेश (वय अडीच वर्षे) यास घरात झोपवून गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास अचानक घरातून धुराचा कल्लोळ आलेले शेजारी असलेल्या माणसाला दिसले. जवळच शेतावर काम करण्यासाठी गेलेले घरातील हनुमंत व उल्हास वाघमारे यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी संपूर्णपणे घराला आगीने वेढलेले होते. घरात लहान गणेश झोपलेले लक्षात आल्याने त्याला वाचवण्यासाठी उल्हास यांनी मोठ्या धाडसाने आगीत प्रवेश करून बाहेर काढण्यात यश आले.
परंतु, आगीचा भडकाच मोठा असल्यामुळे छोटा लहान गणेश जवळजवळ ८० टक्के भाजला आहे. तर उल्हास यांना आगीत वाचवण्यासाठी गेला असल्याने हाताला भाजलेले आहे. घरातील महागड्या फ्रीज, लॅपटॉप, टीव्ही, पिठाची गिरणी धान्ये पैसे अलंकार कपडे सर्वच जळून खाक झाले आहेत. दोन्ही घरातील जवळजवळ ८ लाख रुपएचे नुकसान झालेले आहे. उल्हास व हनुमंत यांनी शीतापीने प्रयत्न करून गणेशला बाहेर काढल्याने कौतुक करत आहेत. या घडलेल्या घटनेचे जबाब वालचंदनगर पोलीस ठाण्यात उल्हास वाघमारे यांच्या समक्ष नोंदवून घेण्याचे चालू आहे.