बालकामगार राबताहेत बिनबोभाट
By admin | Published: June 13, 2016 01:53 AM2016-06-13T01:53:11+5:302016-06-13T01:53:11+5:30
उद्योगनगरीतील अनेक लघु आणि सुक्ष्म उद्योगांमध्ये कोवळ्या वयाची बालके काबाडकष्ट करताना दिसली.
मिलिंद कांबळे/नीलेश जंगम,
पिंपरी- उद्योगनगरीतील अनेक लघु आणि सुक्ष्म उद्योगांमध्ये कोवळ्या वयाची बालके काबाडकष्ट करताना दिसली. मळकटलेले कपडे, चेहरा काळवंडलेला, पायात तुटकी चप्पल घातलेल्या या बाल कामगारांच्या डोक्यावर हेल्मेट, हातात ग्लोव्हज्, पायात बूट, गॉगल, औद्योगिक पोशाख अशी सुरक्षेची कोणतीही साधने नव्हती. १० ते १४ वयोगटातील मुलांकडून धोकादायक ठिकाणी काम करवून घेतले जात असल्याचे विदारक दृश्य ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे समोर आले.
कोणत्याही आस्थापनेत १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे किंवा त्यांच्याकडून धोकादायक काम करवून घेण्यास कायद्याने बंदी आहे. असे असतानाही औद्योगिक परिसरासह उपनगरात बालकामगारांची संख्या मोठी असल्याचे धक्कादायक चित्र शनिवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. विशेषत: कुदळवाडी, चिखली भागात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसले. दोन-तीन वर्कशॉप सोडले की, बालकामगार सर्रासपणे दृष्टीस पडत होते. ते कामात इतके व्यस्त होते की, वर्कशॉपमध्ये कोण आले आणि गेले याचे त्यांना काहीच घेणे-देणे नव्हते. ते कामात व्यस्त दिसत होते. चौकशी केली असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तेथील कामगारांनी छायाचित्र घेण्यासही अटकाव केला. आजूबाजूच्या इतर काही कामगार आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
त्यात मिळालेली माहिती धक्कादायक आहे. सकाळी सुरू होणारे वर्कशॉप रात्री उशिरा बंद होतात. जेवणाची सुटी वगळता त्यांना विश्रांती अशी नाहीच. मळकटलेल्या कपड्यांत दिवसभर काम केले जाते. सोबतीला तरुण कामगारही असतात. अपुरा प्रकाश, कुबट आणि दुर्गंध वायूने भरलेले वर्कशॉप, सुरक्षा उपकरणे न वापरता मुले धोकादायकरीत्या काम करीत होते. लोखंडी गज, पत्रा, ठोकळे उचलून ठेवणे, त्याचे कटिंग करणे असे अतिधोकादायक कामे ती कोवळी जीव करीत होती.
तसेच, काही वर्क शॉपमध्ये मुले वेल्डिंगची कामे करताना दिसली. त्याचबरोबर टायर मोल्डींगचे काम ती करीत होते. शिल्लक राहिलेले टायर आणि ट्युबचे तुकडे जमा करणे, ती वाहनात भरणे आदी कामे लहान मुले करीत होते. प्लॅस्टिकची पोती शिलाईचे अनेक वर्कशॉप येथे आहेत. तेथे एक तरी बालकामगार काम करीत असल्याचे दिसून आले. प्लॅस्टिकची रिकामी पोती वेगळी करणे, ती व्यवस्थित घडी करून गठ्ठे करणे, त्याची ताडपत्रीप्रमाणे शिलाई करण्यात लहान मुलेच आघाडीवर होते. ही वर्कशॉप प्लॅस्टिक पोत्यांनी अक्षरश: भरले होते. तेथे श्वासही घेणे अवघड होत होते. भंगार दुकानात लोखंड, प्लॅस्टिक, कागद आदी साहित्याचे वर्गीकरण करणे, त्यांचा एका बाजूस ढीग लावणे आदी कामे लहान मुले करीत होते.
पंक्चर काढणे, वाहन धुणे, भाजी व फळे विक्री, हॉटेल, टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, भंगार आदी ठिकाणी बालमजूर आढळले. त्याचबरोबर शहरात वीट्टभट्टी, फर्निचर, किराणा, बांधकाम, रस्तेबांधणी, बेकरी, हॉटेल, टपऱ्या आदी ठिकाणी लहान मुले उघडपणे काम करीत असल्याचे चित्र दिसले. खाद्यपदार्थ, चहा- नाश्ताच्या हातगाड्या आणि टपऱ्यांवर तर बालकामगार हमखास दिसतात. गॅस आणि स्टोव्हवर चहा करताना बालके दिसतात. गरम चहा करणे, तो किटलीत भरणे आदी कामे ती सहज करतात. शहरातील अनेक चौकांत असंख्य हातगाड्यांवर हे दृश्य सर्वांनीच पाहिले असेल. या बालकामगारांकडून चहा आणि सिगारेट घेताना सुशिक्षितांना काहीच वाटत नाही. चौकांतील वाहतूक पोलिसांसमोर बालकामगार राबत असतात, मात्र ते त्याकडे साफ दुर्लक्ष करतात.
शहरात सर्रासपणे लहान मुलांकडून कामे करून घेतली जातात. दुपारी अडीचच्या सुमारास कुदळवाडीतील एका पंक्चरच्या टपरीबाहेर मोटारीच्या चाकात हवा भरताना एक मुलगा आढळून आला. प्रतिनिधीच्या हातात कॅमेरा पाहताच तो घाबरला. त्याची विचारपूस केली असता, त्याने सांगितले की मी येथे राहत नाही. मोशी येथे राहतो. शाळेला सुटी असल्याने काम करत आहे.
आणखी एका पंक्चरच्या दुकानात लहान मुलगा वाहनांच्या चाकात हवा भरताना दिसला. वाहनांचे स्पेअरपार्ट मिळणाऱ्या एका दुकानात एक ९ ते १० वर्षांचा मुलगा ग्राहकांना दुकानातील वस्तू काढून देत होता. तो मुलगा घरातीलच एक सदस्य होता. आपल्या कुटुंबीयांना तो दुकानात मदत करीत असल्याचे सांगितले.
शहरातील हॉटेल, चहा-नाष्ट्याच्या टपऱ्या, गॅरेज, पंक्चरची दुकाने अशा विविध ठिकाणी नियम धाब्यावर बसवून लहान मुलांकडून काम करवून घेतले जाते. शहरातील मोठ्या कंपन्या, हॉटेलच्या बाहेर ‘येथे बालकामगार काम करत नाहीत’ असा फलक लावला जातो. मात्र, लघुउद्योगात अजूनही सर्रासपणे लहान मुलांकडून काम करवून घेतले जाते.
>परप्रांतीय बालकामगारांचा भरणा अधिक
बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांतून रोजीरोटीसाठी आलेल्या कामगारांचा शहरात भरणा आहे. ते कोणतेही काम करण्यास तयार होतात. दररोज १०० ते ४०० रुपये हजेरीवर ते दिवसभर काम करतात. बहुतेक कामगारांची भाषा हिंदी होती. ते हिंदीतच बोलत होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विनंती करीत काम मिळवितात. दिवसरात्र मेहनत करून दर आठवड्यास किंवा महिन्यास ठरावीक रक्कम घरी पाठवितात. धोकादायक काम करताना सुरक्षासाधनांकडे साफ दुर्लक्ष केले जाते. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून आलेले बालकामगारही काही ठिकाणी दिसले. मात्र, हे प्रमाण कमी आहे.
>छायाचित्र घेण्यास अटकाव
बाल कामगारांची छायाचित्र घेताना ते स्वत: आणि त्याचे सहकारी कामगार अटकाव करीत होते. छायाचित्र का घेता, काय झाले, हे काम तर, कितीतरी वर्षांपासून सुरू आहे. सर्वत्र लहान मुले काम करीत आहेत. मग, येथीलच का छायाचित्र घेता, असा सवाल काहींनी विचारला. काही ठिकाणी मोबाइलवरून छुप्या पद्धतीने छायाचित्र घेण्यात आली. छायाचित्र घेत असल्याचे लक्षात येताच काही ठिकाणी त्वरित बाल कामगारांना आतील भागात पाठविले जाई. काहींनी तर छायाचित्र काढूच दिले नाही. पंक्चर काढणाऱ्या लहान मुलांचे छायाचित्र घेताना त्याला शेजारच्या टपरीवाल्याने खुणावले आणि अचानकपणे बालकामगार काम सोडून टपरीत जाऊन बसला. छायाचित्र काढत असल्याचे समजताच एका बालकामगाराने हवा भरणे सोडून दिले. हवा भरण्याची नळी व हवा मोजण्याचे यंत्र घेऊन तो निघून गेला. किराणा दुकान, शिलाई दुकान आदी ठिकाणीही याच प्रकारचा अनुभव आला.