बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन गरजेचे
By Admin | Published: December 28, 2016 04:24 AM2016-12-28T04:24:07+5:302016-12-28T04:24:07+5:30
मानवाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधनासाठी एकत्रित पावले उचलली पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत स्वबळावर वेगाने वाटचाल
बारामती : मानवाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधनासाठी एकत्रित पावले उचलली पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत स्वबळावर वेगाने वाटचाल करीत आहे, ही बाब समाधानाची आहे. संशोधनाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या पुढच्या काळात बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.
बारामती येथे विद्या प्रतिष्ठान माहिती तंत्रज्ञान, केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान कॉग्रेसचे उदघाटन डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे, टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, माहिती, तंत्रज्ञान विभागाचे डॉ. अमोल गोजे आदी उपस्थित होते.
पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील, तसेच आशियाई, आखाती देशांचे जवळपास ७०० बालवैज्ञानिक सहभागी झाले आहेत.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण होते. आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याच्या उज्ज्वल भारताचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी लपले आहेत. विज्ञानाला चांगले भवितव्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील तरुणांच्या पात्रतेबाबत आत्मविश्वास आहे. त्यातूनच युवकांसाठी स्टार्ट अप, स्टॅण्ड अप इंडियासारखे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानच्या वतीने बारामतीमध्ये कायमस्वरूपी ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे.
या वेळी टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, नवनिर्वाचित नगराध्यक्षा पौर्णिमा जगताप, अभियंता सुजीत बॅनर्जी, वरिष्ठ शास्त्रज्ञ मिलिंद कुलकर्णी, टी. पी. रघुनाथ, अॅड. निलीमा गुजर, सचिव द. रा. उंडे आदी उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड ए. व्ही. प्रभुणे यांनी आभार मानले.
...रोबोटने केले स्वागत
२४ व्या राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शन उदघाटनाच्या वेळी
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांचे रोबोट ने पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. तसेच, डॉ वर्धन यांना ‘सॅल्युट’ देखील केला. या आगळ्या वेगळ्या स्वागताने डॉ वर्धन भारावले. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाषणादरम्यान माहिती दिली.
परदेशी बालवैज्ञानिक
बालवैज्ञानिकांचे भीत्तिपत्रक सादरीकरण, खाऊगल्ली, वैज्ञानिक प्रयोग, रॉकेट तंत्रज्ञान, विमान, रोबोट प्रदर्शन, सर्प दर्शन आकर्षण ठरत आहे. व्हीएतनाम, कुवेत, कतार आदी देशांतून १९ बालवैज्ञानिक देखील सहभागी झाले आहेत.
नोबेल पारितोषिक
विजेत्या शास्त्रज्ञांशी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी बालवैज्ञानिकांना मिळणार आहे.