जेव्हा चिमुकलेच चिमुकलीसाठी न्याय मागतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:55 PM2018-04-17T14:55:51+5:302018-04-17T14:55:51+5:30
कठुअा तसेच उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच कठुअा घटनेतील चिमुरडीच्या न्यायाच्या मागणीसाठी अाज विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या हाेत्या. अांदाेलकांनी काहीकाळ टिळक रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न केला.
पुणे : चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, वी वाॅन्ट जस्टीस, हल्ला बाेल हल्ला बाेल, इस शासन पे हल्ला बाेल, अश्या घाेषणा देत कठुअा घटनेतील चिमुकलीसाठी न्यायाची मागणी करण्यात अाली. माेठ्यांसाेबतच चिमुकले जम्मूतील कठुअा मध्ये नराधमांच्या वासनेची शिकार झालेल्या चिमुकलीच्या न्यायासाठी हाक देत हाेते. चिमुकलेच चिमुकलीच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले हाेते.
कठुअा अाणि उन्नाव येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध अांदाेलनाचे अायाेजन एस.पी. महाविद्यालयाच्या समाेर करण्यात अाले. यात विविध सामजिक संघटनांच्या कार्यकत्यांबराेबरच चिमुकलेही माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. कठुअा घटनेतील चिमुकलीला न्यायाची मागणी हे चिमुकले यावेळी करत हाेते. सकाळी 11 च्या सुमारास या अांदाेलनाला सुरुवात करण्यात आली. भारतीय महिला शक्ती केंद्र, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय दलित पॅंथर, फुले शाहू अांबेडकर विचार मंच, कम्युनिस्ट पार्टी, अाराेग्य फाऊंडेशन, एमअायएम, फॅमिली काेर्ट बार असाेसिएशन, रिपब्लिकन युवा माेर्चा अादी संस्था, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक या अांदाेलनात सहभागी झाले हाेते. हातात बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करणारे, तसेच चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे असे लिहिलेले पाेस्टर घेण्यात अाले हाेते. घाेषणा दिल्यानंतर काही काळ रास्ता राेकाे करुन रस्त्यातच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न अांदाेलकांनी केला. मात्र पाेलीसांनी अांदाेलकांना बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.
यावेळी बाेलताना ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या प्रभावामुळे बलात्काराचे गुन्हे करणाऱ्यांना माेकाट साेडलं जात असल्याचे दिसून येत अाहे. बलात्काऱ्यांवर गुन्हे दाखल हाेऊ नये म्हणून भाजपचे मंत्री रस्त्यावर येऊन अांदाेलने करत अाहेत. इतकी भयानक अराजकता व संवेदनशुन्यता कधीच निर्माण झाली नव्हती. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अाम्ही येथे जमा झाले अाहाेत. देशातली जनता या सरकारला खाली खेचून बलात्काऱ्यांना पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे म्हणाले, बलात्काऱ्यांच्या पाठीशी जर भाजपचे नेते, कार्यकर्ते उभे राहत असतील तर अाम्हाला लाज वाटते की अाम्ही अश्या नालायक सरकारला निवडून दिलं, जे नागरिकांना तसेच मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही. या देशात महिला सुरक्षित नाहीत तसेच सामाजिक अशांतता निर्माण झाली अाहे. कठुअा व उन्नाव घटनेतील अाराेपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी.