'मुलांनो मोठी अन् विकसित भारताची स्वप्ने पहा', पुण्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 04:58 PM2022-11-20T16:58:51+5:302022-11-20T16:59:05+5:30
तुम्ही आज पाहिलेली स्वप्ने उद्या सत्यात उतरवू शकतात
शेलपिंपळगाव : भोसे (ता.खेड ) येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींची भेट घेत त्यांच्याशी साधला संवाद साधला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भोसे ते दिल्ली अशा ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. तर राष्ट्रपती भेटीसाठी राष्ट्रपती कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला होता.
शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य, स्पर्धा परीक्षेतील घवघवीत यश, शाळेचा १०० टक्के निकाल या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रपतींनी भेटीचे आमंत्रण प्रशालेस दिले होते. यापार्श्वभूमीवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. देशभरातून १०० शाळांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या एकमेव शाळेची निवड करण्यात आली होती.
याप्रसंगी श्वेता जाधव, जानवी कुटे, समिक्षा कुटे, प्रणाली कोळी, आर्यन गांडेकर, नैतिक गायकवाड, ओंकार चितळे, शुभम गांडेकर या आठ विद्यार्थ्यांनी व चतुर पाटील, योजना कुटे, कैलास निळकंठ, हनुमंत तापकीर, रुपाली कोळेकर, शितल हिंगे, ऐश्वर्या वायभासे, रोहन सावंत या शिक्षकांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करून मनमोकळेपणाने संवाद साधला. राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा शाळेविषयी, संस्थेविषयी मोठ्या आपुलकीने विचारपूस केली. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट अनुभवताना विद्यार्थ्यांना विलक्षण आनंद झाला.
मोठी विकसित भारताची स्वप्ने पहा - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
''बालपण हा आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा असतो. मुले ही आहेत तशी स्वतःला स्वीकारतात. यामुळेच ती चैतन्यदायी असतात. मुलांची हीच निरागसता आणि पावित्र्य आज आपण साजरे करत आहोत. मोठी स्वप्ने पहा आणि नवीन तसेच विकसित भारताची स्वप्ने पहा. आज पाहिलेली स्वप्ने उद्या सत्यात उतरवू शकतात''