लक्ष्मीनगर मधील मुलांनी उलगडली ''माझी वस्ती ''
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 08:15 PM2019-06-04T20:15:00+5:302019-06-04T20:19:12+5:30
टवाळखोरी, अंधश्रध्दा, मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे या घटना देखील चित्रप्रदर्शन तसेच मुलाच्या सादरीकरणात दिसून आले.
पुणे : कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीजवळच्या लक्ष्मीनगर येथे वसाहतीतील मुलांनी चित्रप्रदर्शन व सादरीकरणच्या माध्यमातून आपल्या वसाहतीतील भावविश्व लोकांसमोर उलगडले. पालकनीती परिवाराच्या खेळघर या मागील २२ वर्षांपासून येथे कार्यरत असलेल्या संस्थेच्या माझी वस्ती या विषयावरील सादरीकरणानिमित्त येथे सर्व जण जमले होते.
लक्ष्मीनगर हे कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी जवळील सुमारे दोन हजार लोकांची वसाहत. शहराच्या इतर वसाहतींमध्ये असतात, तसेच रोजच्या समस्या इथेही ठरलेल्याच. येथील मुलेही इतर मुलांप्रमाणेच विकसित व्हावीत, अभ्यासात नीतीमूल्यात मागे पडू नये यासाठी खेळघर या संवाद गटाच्या माध्यमातून अभ्यास वर्ग घेऊन प्रसंगी पालकांचे समुपदेशन करून मुलांच्या विकाससाठी केला गेलेला प्रयत्न म्हणजे खेळघर.
यावेळी प्रदर्शनात ठेवलेल्या चित्रामधून लहान मुलांनी येथील समस्या तसेच चांगल्या गोष्टीही मांडल्या. येथील जुनी पत्र्याच्या घरे आपले रुपडे बदलत पक्क्या घरात बदलत आहेत. भरपूर पाणी आणि ड्रेनेज समस्या आता संपली आहे. याबरोबरच येथील टवाळखोरी, अंधश्रध्दा, मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे या घटना देखील चित्रप्रदर्शन तसेच मुलाच्या सादरीकरणात दिसून आले.
येथील मुलांनी आपली वस्ती कशी असावी यावर देखील त्यांच्या नजरेतून भाष्य केले. येथे पार्किंग स्लॉट, रुंद रस्ते, खेळायला मैदान, मुलींवरची कमी बंधने, वस्तीची आतूनही चांगली स्वच्छता, घरात भांडणे नसावीत, दारूबंदी आदी प्रमुख मागण्या त्यांनी सादर केल्या.
खेळघराच्या माध्यमातून लहानाचे मोठे झालेले व आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या युवकांनीही मनोगत व्यक्त केले. परशुराम १२ वीत चांगल्या गुणांनी पास झाला. हनुमंत मोहिते यास बांधकाम अभियंता होण्यासाठी पहिल्या परदेशवारीसाठी खेळघरानेच मार्गदर्शन केले होते. प्रिया बग्गी हिने वस्तीतील मुलींच्या समस्यांना वाचा फोडली. मोठ्या बहिणींवर लहान मुलांची व घराची जवाबदारी, त्यातून शाळा सुटणे किंवा १० पर्यंतही न पोहोचणे व लवकर लग्न आदी घटनाक्रम तिने ओघवत्या शैलीत उलगडला.
शेवटी खेळघराच्या माध्यामातून मुलांना हसत खेळत शिक्षण तसेच शिकण्याची गोडी निर्माण करण, क्षमतांचा, विचारांचा व मूल्यांचा सातत्याने विकास करण याचेच विवेचन या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले.
.......
शुभदा जोशी, समन्वयीका, खेळघर – पालकनीती परिवाराच्या “खेळघर” या प्रकल्पात अजूनही भरीव कामे करण्यास वाव आहे. मुख्य म्हणजे इतकी वर्षे कामे करून, मुलांमध्ये सकरात्मक बदल पाहूनही अजूनही बरेच पालक व मुले या प्रकल्पास कमी प्रतिसाद देतात. सामाजिक आर्थिक बाबीशी झगडत हे काम पुढे नेत आहोत. येथील अनेक यशस्वी युवक, मुलांमधील सकारात्मक बदल, त्यांच्या क्षमतेत झालेली वाढ बघून मात्र आमच्या सहकार्यांना अधिकाधिक ऊर्जा मिळत राहते.