मुलांनी वाममार्गाला न लागता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:05+5:302021-09-25T04:10:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंचर : मुले-मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारची आमिषे दाखविली जातात. यामुळे मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : मुले-मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारची आमिषे दाखविली जातात. यामुळे मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. १६ ते १७ वयोगटातील मुलगी गर्भवती राहिली तर पुढचे आयुष्य वेगळ्या मार्गाने जायला सुरुवात होते, याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. गुन्हे दाखल होतात; परंतु नंतर त्या मुलीचे शिक्षण बंद पडते. यामुळे मुलांनी शिक्षणाकडेच लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी देश पातळीवर काम करणाऱ्या कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन व मंचर येथील ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेची पोलीस विभागाला फार मदत होणार आहे, असे प्रतिपादन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने एकूण ८ लाख रुपये किमतीचे ३० ग्रामपंचायतींना कोविड किट व उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे वाटप डॉ. देशमुख यांच्या हस्ते केले. याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पराग मिल्क फुड्सचे कार्यकारी संचालक प्रीतम शहा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जि. प. सदस्या अरुणा थोरात, सभापती संजय गवारी, राजाराम बाणखेले, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, डॉ.अंबादास देवमाने, डॉ.सुदाम खिलारी, गोविंद खिलारी, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, जगदीश घिसे, रंजना शेटे, उत्तम भेके, रागिणी बोऱ्हाडे उपस्थित होत्या.
डॉ. देशमुख म्हणाले, “देश पातळीवर काम करणाऱ्या कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन या संस्थेसोबत ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था काम करत आहे. त्याचा फायदा निश्चित पोलीस दलाला व “भरोसा सेल”ला होणार आहे.”
विवेक वळसे पाटील म्हणाले, “गेली १६ वर्षे महिलांचे विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच पाणलोट क्षेत्र विकासातही ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे मोठे योगदान आहे. यापुढे गार्गी विशाल काळे पाटील यांच्या माध्यमातून मुला-मुलींना योग्य प्रबोधन करण्याचे काम संस्था चांगल्या पद्धतीने करेल, असा विश्वास आहे.”
प्रीतम शहा म्हणाले “ दुध व्यवसायात व सेंद्रिय शेतीबाबत महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी पराग मिल्क फूड्स व भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मतर्फे संस्थेला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.” बाळासाहेब बेंडे म्हणाले, “महिला व लहान मुला-मुलींना प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.” डॉ. देवमाने म्हणाले, “कोरोना काळात जनजागृती करण्याच्या कामात ज्ञानशक्तीचे योगदान आहे.”
गार्गी काळे पाटील म्हणाल्या, “राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पाठबळ व मार्गदर्शन मिळाल्यामुळे संस्थेने महिला व बाल सक्षमीकरण क्षेत्रात काम केले आहे. यापुढे शाळा, महाविद्यालयांत जनजागृतीचे काम केले जाईल. कैलास फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक प्रसाद ताठे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. डॉ. सुदाम खिलारी यांनी आभार मानले. जागृती महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
फोटोखाली : मंचर उपजिल्हा रुग्णालयात कैलाश फाउंडेशन व ज्ञानशक्ती संस्थेच्या वतीने ग्रामपंचायतींना कोविड किटचे वाटप पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले.