मैैदानापेक्षा ‘व्हर्च्युअल’ गेममध्येच अडकताहेत मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:09 PM2019-06-03T14:09:06+5:302019-06-03T14:09:41+5:30
टीव्हीवरील डोरेमॉन, पोकेमॉन, निंजाहातोडी, कृष्णा, छोटा भीम या कार्टून विश्वातच हे लहान मुले रमत आहेत.
- तेजस टवलारकर-
पुणे : पूर्वी लहान मुले शाळा सुटली की, मैदानावर खेळण्यासाठी धूम ठोकत असत. परंतु, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट हाती आल्यामुळे ही मुले आता मैदानी खेळापेक्षा घरीच व्हर्च्युअल विश्वात रमत असल्याचे दिसून येत आहे. मैैदानी खेळांमुळे आरोग्य चांगले राहायचे; पण सध्या या व्हर्च्युअल गेममुळे आरोग्य तर बिघडते आहे आणि मानसिक स्थितीही एकलकोंडी होत आहे. टीव्हीवरील डोरेमॉन, पोकेमॉन, निंजाहातोडी, कृष्णा, छोटा भीम या कार्टून विश्वातच हे लहान मुले रमत आहेत.
मोबाइलमधील थ्रीडी गेम ऑनलाइन चॅटिंग विविध प्रकारचे गेम डाउनलोड करणे, यूट्यूबवर कार्टून पाहणे आदी प्रकार वाढले आहे. घरातील ज्येष्ठ टीव्हीवर बातम्या, सिरियल्स, चित्रपट पाहण्यात मोठी मंडळी व्यस्त असताना बच्चे कंपनी मात्र कार्टून पाहण्याचा हट्ट करतात. कार्टून चॅनल लावून दिले नाही तर मुले घर डोक्यावर घेतात. त्यामुळे कार्टून चॅनल लावून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. बहुतांश लोकांच्या घरातील हे चित्र आहे. अशा या कार्टूनच्या विश्वात मुले तासन्तास रमतात, मात्र याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याने पालकांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. टीव्हीसमोर बसून कार्टून पाहणे लहान मुलांच्या आवडीची बाब होत चालली आहे. कार्टून पाहण्यासाठी मुले हट्टही करतात. मुलांनी शांत बसावे यासाठी त्यांना टीव्हीवर कार्टून चॅनल लावून दिले जात आहे. ५ वर्षांपासून ते १५ वर्षांपर्यंतची मुले टीव्हीवर कार्टून पाहणे अधिक पसंत करीत आहेत. दिवसातील एक-दोन तास चांगल्या गुणवत्तेचे कार्यक्रम मुलांनी टीव्हीवर पाहायला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे..
..........
आजारांना निमंत्रण : डोळ्यांवर येतो ताण
तासन्तास कार्टून पाहण्यासाठी मुले टीव्हीच्या स्क्रिनवर एकटक पाहत आहेत. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. तसेच डोळ्यांतून पाणी येणे, लाल होणे, खाज येणे असा त्रास त्यांना होत आहे. त्याचप्रमाणे कमी उजेडात टीव्ही पाहिल्यानेही डोळ्यांवर ताण पडतो. त्यातून नेत्रासंबंधी दोष उद्भवू शकतात. कमी वयात चष्मा लागण्याची शक्यता निर्माण होते. अधिक वेळ टीव्ही पाहण्यामुळे मुलांचे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मैदानी खेळ खेळण्यास पसंती दिली पाहिजे. बौद्धिक विकासाला चालना देणारे खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
........
लहान मुलांचा कल हा मैदानी खेळांच्या तुलनेत मोबाईल व इंटरनेटवर विविध प्रकारचे व्हिडिओ, कार्टून पाहण्याकडे अधिक असल्याचे दिसून येते. आजची पिढी हे उद्याचे भवितव्य असल्यामुळे त्यांना शक्तिशाली बनवणे ही काळाची गरज आहे. मैदानी खेळ खेळणे कमी झाल्यामुळे अनेक आजारदेखील होण्याची भीती असते. मुलांना खेळायला मैदानसुद्धा राहिले नाही, अशी स्थिती आज आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळावे यासाठी व सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.
- माधुरी सहस्रबुद्धे, संचालिका, भारती निवास सोसायटी बालरंजन केंद्र
.........
मुलांना मैदानी खेळाचे महत्त्व नुसते सांगून उपयोगाचे नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून पटवून देण्याची गरज आहे. खेळ खेळल्याने शारीरिक क्षमता वाढते व आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. ज्येष्ठ व्यक्तींचा व मुलांचा संवाद कमी झाला आहे. त्यामुळेदेखील मुले मोबाईल, व्हिडिओ, कार्टून पाहण्याकडे वळल्याचे दिसून येते.
- डॉ. निरंजन पंडित, बाल व मानसोपचारतज्ज्ञ